द्राक्षे शरीराच्या पचनसंस्थेसाठी गुणकारी फळ | पुढारी

द्राक्षे शरीराच्या पचनसंस्थेसाठी गुणकारी फळ

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की आतड्यांच्या आरोग्यासाठी द्राक्षे लाभदायक ठरतात. शरीराच्या पचनसंस्थेसाठी हे फळ गुणकारी आहे.

हेल्थ जर्नल असलेल्या ‘न्यूट्रिएंटस्’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार द्राक्षे ही कोलन हेल्थ, किमोथेरेपीच्या साईड इफेक्टना कमी करणे आणि एकूणच आतड्याचे आरोग्य चांगले ठेवणे यासाठी प्रभावी असतात.

पित्त, आम्लाची पातळी, कोलेस्टेरॉल आणि आतड्यांमधील उपयुक्त जीवाणू यावर द्राक्ष्यांच्या सेवनाचा सकारात्मक परिणाम होतो. या संशोधनासाठी तज्ज्ञांनी चार आठवड्यांच्या कालावधीत काही लोकांची पाहणी केली. या लोकांना रोज 46 ग्रॅम द्राक्षे खाण्यास देण्यात आले.

चार आठवड्यांनंतर त्यांच्या एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलच्या पातळीत 5.9 टक्के घट आणि आतड्यांमधील उपयुक्त जीवाणूंमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. द्राक्ष्यांमधील फायबरचे उच्च प्रमाण तसेच कॅटेचिन-फायटो केमिकल्समुळे हा प्रभाव दिसतो. आतड्यांमधील जीवाणूंचे यामुळे संतुलन साधले जाते. त्यांच्यामधील बदल हे चयापचय क्रियेशी संबंधित विकार, हृदयरोग आणि लठ्ठपणाच्या जोखमीशी संबंधित आहेत.

Back to top button