लघुग्रहाला धडकण्यासाठी उद्या जाणार ‘नासा’चे यान | पुढारी

लघुग्रहाला धडकण्यासाठी उद्या जाणार ‘नासा’चे यान

वॉशिंग्टन : ‘नासा’ने ‘डिमोर्फोस’ नावाच्या लघुग्रहाला धडक देण्यासाठी ‘डार्ट’ नावाचे आपले एक अंतराळ यान सोडण्याची योजना आखली आहे. ‘डार्ट’ची निर्मिती ‘डबल अ‍ॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट’ करण्यासाठीच झाली आहे. या चाचणीसाठी डार्ट यानाला ‘स्पेस एक्स’च्या ‘फाल्कन-9’ या रॉकेटच्या सहाय्याने बुधवार, दि. 24 नोव्हेंबरला सकाळी अंतराळात सोडण्यात येईल.

पृथ्वीजवळून अनेकवेळा लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह जात असतात. अशा अवकाशीय शिळा बर्‍याच वेळा अतिशय धोकादायक अंतरावरूनही जातात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोरसारख्या अनेक जीवांचा र्‍हास झाला होता. आता ‘नासा’ने पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एखाद्या लघुग्रहाची दिशा बदलता येऊ शकते का हे पाहण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या यानाला लघुग्रहावर आदळवले जाईल. अशा प्रकारचे हे पहिलेच परीक्षण आहे.

बहुतांश लघुग्रह इतक्या छोट्या आकाराचे असतात की पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून जाऊ शकतात. मात्र, अंतराळात अनेक लघुग्रह इतक्या मोठ्या आकाराचे आहेत की ते पृथ्वीसाठी धोकादायकही ठरू शकतात. मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान तर अशा लघुग्रहांचा एक पट्टाच असून त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते.

आता ‘नासा’ ज्या लघुग्रहावर यान सोडणार आहे तो ‘डिमोर्फोस’ लघुग्रह ‘डीडिमोस’ नावाच्या एका मोठ्या लघुग्रहाभोवती फिरत आहे. त्याची रुंदी 169 मीटर आहे. या धडकेने लघुग्रहाला दिशा आणि गती अशा दोन्हींमध्ये बदल होईल असा विश्वास संशोधकांना वाटतो. अर्थात या लघुग्रहाचा पृथ्वीला कोणताही धोका नसून ही केवळ संशोधनात्मक चाचणी आहे. भारतीय वेळेनुसार 24 नोव्हेंबरला सकाळी 11.50 वाजता ‘डार्ट’ यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

Back to top button