लंडन : फिजीमध्ये पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेल्या पठारी भागात अतिशय प्राचीन काळापासूनच एक मोठी संरचना तयार होत आलेली आहे. ही संरचना इडाहोपेक्षाही मोठी आहे हे विशेष. क्रेटाशियस काळात म्हणजेच 145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळात ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे ही संरचना बनण्यास सुरुवात झाली आणि ती अद्यापही सुरूच आहे.
सोलोमन आयलंड्सच्या पूर्वेकडे समुद्रात मेलानेशियन बॉर्डर पठार आहे. त्यांची रचना ज्वालामुखीच्या वेगवेगळ्या चार उद्रेकांमुळे झाली आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. महासागरांच्या तळाशी होणार्या मोठ्या ज्वालामुखीच्या घटनांचा अतिशय कमी अभ्यास झालेला आहे, असे लास वेगासमधील नेवाडा युनिव्हर्सिटीचे केव्हिन कोनराड यांनी सांगितले. काही वेळा या रचना एकाच मॅग्मा प्रवाहामुळे बनतात.
त्यावेळी हा प्रवाह अतिशय मोठा असतो. असे मोठे ज्वालामुखीय उद्रेक कधी कधी हवामानावरही परिणाम करतात आणि जीवांच्या र्हासालाही जबाबदार ठरतात. काही संरचना या काळाच्या दीर्घ ओघात हळूहळू बनतात. कोनराड आणि त्यांच्या सहकार्यांनी मेलानेशियन बॉर्डर प्लॅटूमधील नमुने 2013 मध्ये गोळा करून त्यावर अभ्यास सुरू केला होता. त्यामधून या अतिशय विस्तृत अशा संरचनेच्या निर्मितीप्रक्रियेवर नवा प्रकाश टाकण्यात आला.