

न्यूयॉर्क : डायनासोरचे जीवाश्म किंवा त्याची अंडी याबाबत सातत्याने जगभरात संशोधन होत असते. आता असंच एक मोठे संशोधन अर्जेंटिनातील ‘नॅशनल काऊंसिल फॉर साईंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च’ अर्थात CONICET नं केले आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक संशोधनांना नवी कलाटणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच संस्थेकडून एक महत्त्वपूर्ण मोहीम राबवण्यात आली होती, जी प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरली असून, पाणबुडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या मोहिमेमुळं समुद्राच्या तळाशी असणार्या विश्वाचा नव्यानं उलगडा होणार आहे. इतकंच नव्हे तर असंख्य संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरणार्या डायनासोरसंदर्भातील बहुविध पैलूंची माहिती या संशोधनातून मिळणार आहे. CONICET च्या जीवाश्मशास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान डायनासोरचं अंडं सापडलं असून हे अंडं साधारण 7 कोटी वर्षांपूर्वीचं असून अद्यापही ते मूळ स्वरूपात असल्याचं म्हटलं जात आहे.
CONICET चे प्रमुख डॉ. फेडेरिको अॅग्नोलिन यांच्या नेतृत्वात हे संशोधन झालं असून, पॅटागोनियाच्या दक्षिणेकडील भागामध्ये हे अंडे आढळले. यापूर्वीही अर्जेंटिनामध्ये डायनासोरची अंडी सापडली; पण मूळ स्वरूपात सापडलेलं हे पहिलंच अंडं ठरत आहे जे सध्या जीवाश्माच्या रूपात दिसत आहे. सदर संशोधनातून अभ्यासकांना डायनासोरच्या प्रजातीचा नेमका विकास कसा झाला आणि पुढे त्यांच्यातील बदलांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी लक्ष वेधून गेल्या याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. किंबहुना डायनासोरचं मूळ लक्षात घेण्यासही यातून मदत मिळेल.
सखोल निरीक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार हे अंडं Bonapartenykus प्रजातीच्या डायनासोरचं आहे. मांसाहारी श्रेणीतील हे लहान डायनासोर असून, त्यांचा वावर कोट्यवधी वर्षांपूर्वी अर्जेंटिनाच्या दाक्षिणात्य भागांमध्ये होता. दरम्यान, हे अंडं ज्या स्थितीत सापडलं तेव्हा त्यावर इतर जीवाश्मांचा थर होता. ज्यामुळं डायनासोर नेमके कसे वाढले, त्यांच्या शरीरात नेमके कसे आणि किती बदल झाले याचीसुद्धा माहिती या अंड्याच्या जीवाश्मातून मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार हे अंडं Patagoniaच्या संग्रहालयात पाठवण्यात येणार असून, स्थानिकांना हे जीवाश्म जवळून पाहता येणार आहे.