युरेनस च्या चंद्रांवर महासागरांचे संकेत | पुढारी

युरेनस च्या चंद्रांवर महासागरांचे संकेत

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेमधील युरेनस या ग्रहाच्या दोन मोठ्या चंद्रांवर महासागर असल्याचे संकेत मिळाले आहेत. युरेनसचे 27 ज्ञात चंद्र असून त्यापैकी सर्वात मोठ्या आकाराच्या टायटेनिया आणि ओबेरॉन या चंद्रांच्या पृष्ठभागाखाली महासागर असण्याची शक्यता असल्याचे खगोल शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील फ्रान्सिस निम्मो यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या चंद्रांवर महासागरांचे अस्तित्व आहे हे खात्रीलायक सांगता येऊ शकते. त्याबाबत आश्चर्य वाटू नये अशी स्थिती आहे.

युरेनस हा एक बर्फाळ ग्रह असून त्याला ‘आईस जायंट’ म्हणूनच ओळखले जाते. त्याच्या टायटेनिया या चंद्राचा व्यास सुमारे 980 मैलांचा म्हणजेच 1576 किलोमीटरचा आहे. ओबेरॉन चंद्राचा व्यास सुमारे 946 मैल म्हणजेच 1522 किलोमीटरचा आहे.

या चंद्रांच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली काही किरणोत्सर्गी घटकांमुळे द्रवरूप पाणी असू शकते. युरेनसचे पाच प्रमुख चंद्र असून त्यामध्ये टायटेनिया, ओबेरॉन, उम्ब्रील, एरियल आणि मिरांडा यांचा समावेश होतो. या पाचही चंद्रांवरील महासागरांचा छडा लावण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

Back to top button