गुरू पेक्षा मोठ्या ग्रहाचा भारतीय संशोधकांकडून शोध | पुढारी

गुरू पेक्षा मोठ्या ग्रहाचा भारतीय संशोधकांकडून शोध

बंगळूर : अहमदाबाद येथील भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा (पीआरएल)च्या संशोधकांनी आपल्या सौरमंडळाबाहेरील एका तार्‍याभोवती भ्रमण करीत असलेल्या ग्रहाचा शोध घेतला आहे. हा ग्रह आपल्या ग्रहमालिकेतील गुरू ग्रहापेक्षाही आकाराने मोठा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने याबाबतची माहिती दिली आहे.

‘इस्रो’ने म्हटले आहे की माऊंट आबू वेधशाळेत लावलेल्या ‘पीआरएल’च्या 1.2 मीटर दुर्बिणीवरील ‘पीआरएल अ‍ॅडव्हान्स्ड रेडियल-वेलोसिटी आबू-स्काय सर्च ऑप्टिकल फायबर फेड स्पेक्ट्रोग्राफ’चा वापर करून हा शोध लावण्यात आला. सौरमंडळाबाहेर पृथ्वीपासून 725 प्रकाशवर्ष अंतरावर हा ग्रह असून त्याचे वजन गुरू ग्रहापेक्षा 1.4 पट अधिक आहे.

डिसेंबर 2020 आणि मार्च 2021 दरम्यान त्याच्या द्रव्यमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये जर्मनीतील टीसीईएस स्पेक्ट्रोग्राफच्या माध्यमातूनही त्याचे मोजमाप करण्यात आले. या ग्रहाच्या तार्‍याला ‘एचडी 82139’ असे नाव देण्यात आले असून ग्रहाला ‘टीओआय 1789 बी’ किंवा ‘एचडी 82139 बी’ असे नाव दिले आहे. या संशोधनाचे नेतृत्व अभिजीत चक्रवर्ती यांनी केले.

हा ग्रह अवघ्या 3.2 दिवसांमध्ये आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा करतो. याचा अर्थ या ग्रहावरील वर्ष अवघ्या 3.2 दिवसांचे असते. आपल्या तार्‍याच्या अतिशय जवळ असल्याने त्याचे तापमानही अत्याधिक आहे.

Back to top button