चांद्रयान-2 चा अपघात सुदैवाने टळला! | पुढारी

चांद्रयान-2 चा अपघात सुदैवाने टळला!

नवी दिल्ली : अपघात केवळ रस्त्यावरच होतात असे नाही. आता अंतराळातही एक अपघात होण्याची वेळ आली होती व सुदैवाने ती टळली. भारताचे ‘चांद्रयान-2’ ची ‘नासा’च्या ‘लूनार रिकनायसन्स ऑर्बिटर’शी धडक होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता. मात्र, त्याची वेळीच कल्पना आल्याने ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-2’ च्या ध्रुवीय कक्षेत बदल केला आणि ही संभाव्य धडक टळली!

भारताच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेत ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग होते. लँडर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरून त्यामधील रोव्हर बाहेर येऊन चांद्रभूमीवर फिरणार होते. मात्र, लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते. तरीही मोहिमेतील ऑर्बिटर चंद्राभोवतीच्या कक्षेत फिरत आपले काम करीत राहिले आहे आणि चांद्रभूमीची अनेक छायाचित्रे व विविध नोंदी पृथ्वीवर पाठवत आहे. अन्यही काही देशांची याने सध्या चंद्राभोवती आहेत.

त्यामध्येच अमेरिकेच्या ‘नासा’चे लूनार रिकायसन्स ऑर्बिटरही आहे. ‘चांद्रयान-2’ आणि हे यान जवळजवळ सारख्याच कक्षेतून भ्रमण करतात. त्यामुळे चंद्राच्या ध्रुवीय भागात ही दोन्ही याने एकमेकांच्या जवळून जात असतात. ‘इस्रो’ने म्हटले आहे की दोन्ही संस्थांनी गेल्या आठवड्यात याबाबतच्या स्थितीचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली. 20 ऑक्टोबरला दोन्ही ऑर्बिटरमधील रेडियल अंतर शंभर मीटरपेक्षाही कमी, जवळचे अंतर तीन किलोमीटरच राहिले. अशी जोखीम कमी करण्यासाठी कॉलिजन अवॉईडन्स मनूवर (सीएएम)ची गरज पडते.

ट्रेकिंगबरोबर कक्षा निर्धारणानंतर डेटामध्ये पुष्टी करण्यात आली की भविष्यात लूनार ऑर्बिटरच्या बाबतीत अशी स्थिती येणार नाही. अंतराळात यानाला अन्य वस्तू धडकण्याचा धोका कमी करण्यासाठी अंतराळ संस्थांना कॉलिजन अवॉईडन्स मनूवरची गरज पडणे ही एक सामान्य बाब आहे. ‘इस्रो’ नियमितपणे अशा वस्तूंच्या अंतराबाबत निरीक्षण करीत असते. अर्थात आता पहिल्यांदाच ‘इस्रो’च्या एका महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेत असे पाऊल उचलावे लागले.

Back to top button