अंतराळ स्थानकाला रशियामुळे निर्माण झाला धोका | पुढारी

अंतराळ स्थानकाला रशियामुळे निर्माण झाला धोका

मॉस्को : अमेरिकेने एका ‘खतरनाक’ आणि ‘बेजबाबदार’ क्षेपणास्त्र चाचणीबद्दल रशियाची निंदा केली आहे. या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहत असलेल्या अंतराळवीरांचे जीवन धोक्यात आल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. या चाचणीत रशियाने आपल्याच एका कृत्रिम उपग्रहाला लक्ष्य बनवले होते. हा उपग्रह क्षेपणास्त्रामुळे नष्ट होऊन त्याचे तुकडे अंतराळात विखुरले. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळ वीरांना आपल्या कॅप्सूलमध्ये लपण्याची वेळ आली!

सध्या या स्थानकावर सात अंतराळवीर असून त्यामध्ये रशियाचेही दोन अंतराळवीर आहेत हे विशेष! या सात जणांमध्ये चार अमेरिकन आणि एक जर्मन अंतराळवीरही आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नेड प्राईस यांनी सांगितले की रशियाने आज एका अँटी-सॅटेलाईट मिसाईलची चाचणी घेण्यासाठी स्वतःच्याच एका सॅटेलाईटला लक्ष्य बनवून त्याला नष्ट केले. या चाचणीमुळे सॅटेलाईटचे 1500 पेक्षा अधिक मोठे आणि हजारो छोटे तुकडे बनले. त्यामुळे सर्वच देशांच्या अंतराळ मोहिमांना धोका निर्माण झाला आहे.

रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने मात्र या घटनेचा अधिक बाऊ होणार नाही याची काळजी घेणारे ट्विट केले आहे. ‘कक्षेत काही वस्तू आल्यानंतर चालकदलाने आपल्या यानात जाणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या वस्तू आता स्थानकाच्या कक्षेबाहेर आल्या असून सध्या अंतराळ स्थानक ग्रीन झोनमध्ये (सुरक्षित) आहे’ असे ट्विट संस्थेने केले आहे.

रशियाच्या हेरगिरी करणार्‍या ‘कॉसमॉस-1408’ या कृत्रिम उपग्रहाला चाचणीवेळी लक्ष्य बनवण्यात आले होते. हे सॅटेलाईट 1982 मध्ये सोडण्यात आले होते. अनेक टन वजनाचे हे सॅटेलाईट गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय करण्यात आला होता.

Back to top button