श्रीलंकेत होणार रावणाच्या विमानाबाबत संशोधन | पुढारी

श्रीलंकेत होणार रावणाच्या विमानाबाबत संशोधन

कोलंबो : आकाशातून उडणारे वाहन किंवा विमान ही संकल्पना राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या आधीपासूनच भारतीयांना माहिती होती. ऋग्वेदापासून रामायणापर्यंत अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये विमानांचे उल्लेख व वर्णने आढळतात. रामायणात म्हटले आहे की लंकाधीश रावणाने त्याचा सावत्र भाऊ असलेल्या कुबेराचे पुष्पक विमान हडपले होते.

याच विमानामधून रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले. रावणवधानंतर याच विमानातून भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीता अयोध्येला परत आले व त्यानंतर श्रीरामांनी हे विमान त्याच्या मूळ मालकाकडे म्हणजेच कुबेराकडे पाठवून दिले. लंकेत रावणानंतरही काही विमानांचा वापर होत होता असे म्हटले जाते. आता रावणाचे हे विमान व त्याच्या काळानंतरची विमाने तसेच विमानतळांबाबत तेथील सरकारकडूनच संशोधन केले जाणार आहे.

जगातील पहिले विमान रावणानेच चालवले असे श्रीलंकावासीयांना वाटते. दोन वर्षांपूर्वी कोलंबोत नागरी हवाई तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्व संशोधक, भूवैज्ञानिक यांची एक परिषद झाली. त्यावेळी याबाबतचीही चर्चा करण्यात आली. श्रीलंकेतून भारतात जाण्यासाठी व भारतातून श्रीलंकेत येण्यासाठी रावणाने त्याच्या विमानामधूनच प्रवास केला होता असा निष्कर्ष या परिषदेतून काढण्यात आला.

या परिषदेनंतर याबाबतचे संशोधन सुरू करण्यासाठी श्रीलंकन सरकारने सुरुवातीला 50 लाख श्रीलंकन रुपयांचा निधी मंजूर केला. कोरोना महामारीमुळे तसेच लॉकडाऊनमुळे हे संशोधन काही काळ थांबले. आता सध्याच्या राजपक्षे सरकारने पुन्हा या संशोधनात रस घेतला आहे. श्रीलंकेच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दाणातुंगे यांनी म्हटले आहे की पुढच्या वर्षीच्या सुरुवातीस याबाबतचे संशोधन पुन्हा सुरू होईल.

शशी हे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ आणि इतिहासाचे अभ्यासकही आहेत. त्यांनी देशाच्या हवाई उड्डाणाचा मागोवा घेण्यासाठी तसेच विविध पुरावे गोळा करण्यासाठी देशभर प्रवास केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सध्याच्या काळात असणारी विमान किंवा विमानतळं प्राचीन काळी नसतील; पण त्यांचे अस्तित्व होते हे खरे आहे. प्राचीन काळात भारत व श्रीलंकेतील काही लोकांना अत्यंत प्रगत तंत्रज्ञान अवगत होते. त्याबाबत वस्तुनिष्ठ संशोधन होणे गरजेचे आहे.

याबाबतच्या संशोधनासाठी भारत सरकारनेही सहयोग द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्रीलंकेचे आघाडीचे पर्यावरणवादी आणि वास्तुरचनाकार सुनेला जयवर्धने यांनीही त्यांच्या ‘द लाईन ऑफ लंका : मिथ्स अँड मेमरीज ऑफ अ‍ॅन आयलंड’ या पुस्तकात रावणाच्या हवाई उड्डाणाबाबत सविस्तर लिहिले आहे.

रावणाच्या वंशातील मयुरांगा राजांकडेही त्यांची विमाने व विमानतळे होती असे त्यांनी म्हटले आहे. या विमानांना धावपट्टीची गरज नव्हती व ती पाण्यावरही उतरवली जाऊ शकत होती असे त्यांनी लिहिले आहे. मात्र, ही विमान उतरवण्यासाठी काही खास जागाही होत्या. थोटुपोलकांधा, उस्सांगोडा, वेहेरांगथोटा, रुमासाला आणि लेकगाला या श्रीलंकेत अशा जागांचे संदर्भ आढळत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Back to top button