ब्रह्मांडाच्या विस्ताराबरोबरच मोठी होत आहेत कृष्णविवरे | पुढारी

ब्रह्मांडाच्या विस्ताराबरोबरच मोठी होत आहेत कृष्णविवरे

वॉशिंग्टन : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांनी विसाव्या शतकात ब्रह्मांडाबाबत एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले होते. त्यांनी म्हटले होते की आकाशगंगा दूर होत चालल्या असून त्यांचे अंतर जसे वाढत आहे तसाच वेगही वाढत आहे. ब्रह्मांडाचा विस्तार होत असल्याचे यावरून दिसून आले होते. मात्र, त्यामागील कारणे स्पष्ट करण्यास वैज्ञानिक असमर्थ ठरले होते. आता खगोल शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने शंभर वर्षांपूर्वीच्या हबल यांच्या सिद्धांताचा आधार घेऊन एक नवे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ब्रह्मांडाच्या विस्ताराबरोबरच कृष्णविवरेही मोठी होत चालली आहेत.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1915 मध्ये सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतानुसार कृष्णविवरांचा एकमेकांमध्ये विलय होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचा आकारही वाढू शकतो. खगोलशास्त्रज्ञांनी या भाकितांची पुष्टी 2015 मध्ये कृष्णविवरांच्या धडकेने निर्माण झालेल्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा पहिल्यांदाच छडा लावून केली होती.

या संशोधनामुळे वैज्ञानिकांची चिंताही वाढली होती. अंतराळात काही कृष्णविवरांचा आकार अनुमानापेक्षाही अनेक पटीने अधिक आहे. हवाई विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ आणि मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की ब्रह्मांडाच्या या रहस्याला उलगडण्यात आता यश येत आहे.

‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ब्रह्मांडाच्या विस्ताराने कृष्णविवरे अधिकाधिक विशाल बनू शकतात. कृष्णविवरांकडे येणारे प्रकाशकिरणही ही कृष्णविवरे गिळंकृत करीत असल्याने त्यांना सहजपणे पाहता येत नाही. काही कृष्णविवरांचा आकार सूर्यापेक्षा 50 ते 100 पटीने अधिक मोठा असू शकतो. ब्रह्मांडाच्या विस्ताराबरोबरच कृष्णविवरांचा आकारही वाढत असल्याने भविष्यात यामुळे असामान्य घटनाही घडू शकतात असे वैज्ञानिकांना वाटते.

Back to top button