प्लास्टिक च्या भांड्यांमधील अन्‍न ठरू शकते हानिकारक | पुढारी

प्लास्टिक च्या भांड्यांमधील अन्‍न ठरू शकते हानिकारक

लंडन : प्लास्टिकचा वापर अनेक बाबतीत केला जात असतो आणि तो चिंताजनकच आहे. बर्‍याच वेळा आपण बाहेरून अन्‍न मागवतो आणि हे अन्‍न प्लास्टिक च्या डब्यांमधून किंवा भांड्यांमधून पाठवले जात असते. असे अन्‍न आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. थंड पदार्थ अशा भांड्यांमधून खाणे एक वेळ चालू शकते; पण उष्ण पदार्थ यामधून खाणे धोकादायक ठरू शकते.

एका संशोधनात असे आढळले की आपण ज्यावेळी गरम अन्‍नपदार्थ प्लास्टिकच्या भांड्यातून, प्लेटमधून किंवा डिस्पोजेबल प्लेटमधून खातो त्यावेळी आजारांचा धोका वाढतो. ‘बिस्फेनॉल ए’ (बीपीए)चा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. ‘बीपीए’ हे प्रामुख्याने पॉली कार्बोनेट किंवा पीसी (रिसायकल कोड 7) नावाच्या प्लास्टिकमध्ये आढळते. जर त्याचाच वापर अशा भांड्यांसाठी केला असेल तर ते विषारी ठरू शकते. त्यामुळे हृदयविकार, स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग यांचा धोका वाढू शकतो.

‘बीपीए’ हे मानवी शरीरातील इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सचे असंतुलन करणारे रसायन असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हार्मोनल असंतुलनामुळे सतत मनःस्थिती बदलणे (मूड स्विंग), चिंता-तणाव, चिडचिडेपणा, अ‍ॅलर्जी, हृदय व रक्‍तवाहिन्यांशी संबंधित आजार व कर्करोगाचाही धोका वाढतो. ‘बीपीए’ने बनलेले प्लास्टिकचे कंटेनर गरम केल्याने अन्‍नातील ‘बीपीए’ची पातळी वाढते.

प्लास्टिकच्या भांड्यांमधील पदार्थ वारंवार खाल्ल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्‍तीही कमी होऊ शकते. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये प्लास्टिकची भांडी ठेवून गरम केली तर ‘बीपीए’ अन्‍नपदार्थांमध्ये 50 पट वेगाने विरघळते आणि धोका आणखी वाढतो.

Back to top button