प्रोस्टेट कर्करोगाचा धोका आहारात बदल करून घटवता येतो | पुढारी

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका आहारात बदल करून घटवता येतो

लंडन : आपले आरोग्य हे आपल्या आहारावरही बर्‍याच अंशी अवलंबून असते. आता मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की आतड्यांमधील सूक्ष्म जीव किंवा जीवाणू आणि प्रोस्टेट कर्करोगाशीही आहाराचा संबंध आहे. हे संशोधन ‘कॅन्सर एपिडेमियोलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी 1.48 लाख लोकांच्या माहितीचे विश्‍लेषण करून याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत. आहारात बदल करून आपण प्रोस्टेट कर्करोगाचा धोका घटवू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार घेतलेल्या 76,685 पुरुषांच्या आरोग्याचे यासाठी विश्‍लेषण करण्यात आले. या लोकांचे वय 55 ते 74 दरम्यान होते. संशोधकांनी या लोकांच्या तेरा वर्षांच्या वैद्यकीय नोंदींचीही माहिती घेतली. त्यानंतर विशेष अभ्यासासाठी 700 पुरुषांची निवड करण्यात आली. त्यापैकी 173 लोकांचा प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने मृत्यू झाला.

विश्‍लेषणानंतर असे दिसून आले की ज्या लोकांच्या आहारात मांस आणि प्राणीजन्य पदार्थांचा अधिक समावेश होता, त्या लोकांच्या आतड्यांमधील जीवाणूंनी त्यांच्यापासून मुक्‍त झालेल्या अणूंचे प्राणघातक अणूंमध्ये रूपांतर केले. त्याचा परिणाम म्हणून या लोकांना प्रोस्टेट कर्करोग झाला.

जेनिटोरिनरी मॅलिग्‍नॅन्सी रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. निमा शरीफी यांनी सांगितले की काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर विशेष आहारामुळे बनलेल्या अणूंमुळे वेगाने वाढतो. चयापचय क्रियेत सहभागी असलेले तीन अणू ‘फेनिलासेटिलग्लुटामाईन’, ‘कोलिन’ आणि ‘बेटेन’ हे थेट प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित आहेत. ज्यावेळी आतड्यातील बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू फेनिलॅलानिनचे विघटन करतात त्यावेळी फेनिलासेटिलग्लुटामाईन तयार होते. काही पदार्थांमध्ये समान कोलिन आणि बेटेन आढळतात.

दुग्धजन्य पदार्थ, मटण, चिकन, सोया, मासे, बीन्स आणि सोड्यामध्ये आढळणारे फेनिलॅलानिनमध्ये उच्च पातळीची प्रथिने असतात. ही प्रथिने शरीरासाठी आवश्यक असतात. मात्र, अधिक मांसाहार किंवा पशुजन्य आहार घेणार्‍यांमध्ये यापासूनही धोका निर्माण होऊ शकतो, कारण जीवाणू या अणूंचे रूपांतर कर्करोगास कारणीभूत ठरणार्‍या घातक अणूंमध्ये करतात.

ज्या लोकांच्या रक्‍ताच्या सीरममध्ये फेनिलासेटिलग्लुटामाईनचे प्रमाण जास्त होते त्यांच्यामध्ये अन्य लोकांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरने मृत्यू होण्याच्या धोक्याचे प्रमाण 2.5 टक्के अधिक होते. ज्या पुरुषांमध्ये कोलिन आणि बेटेनचे प्रमाणही जास्त होते त्यांना हा कर्करोग जडण्याचा धोकाही अधिक होता. त्यामुळे मांसाहार किंवा पशुजन्य पदार्थांचा आहार कमी किंवा मर्यादित स्वरूपात घेणे हितावह ठरते असे डॉ. शरीफी यांनी म्हटले आहे.

Back to top button