लंडन : भारतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही नारळ वाढवूनच होत असते. याबाबत काही लोक विक्रमही घडवत असतात. आता मार्शल आर्टस्मध्ये पारंगत असलेल्या के.व्ही. सैदालवी या भारतीय माणसाने ननचाकू वापरून एका मिनिटात 68 नारळ फोडण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व नारळ काही लोकांच्या डोक्यावर ठेवल्यावर सैदालवी यांनी ते फोडले हे विशेष! गिनिज बुकने या विक्रमाची नोंद केली आहे.
लोकांच्या डोक्यावर ठेवलेले हे नारळ सैदालवी यांना वेगाने फोडून दाखवण्याचे आव्हान होते. त्यांनी केवळ एका मिनिटातच हे काम करून विश्वविक्रम घडवला. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी आपलाच एक जुना विक्रम मोडला आहे. या वर्षाच्या सुरुवातीस त्यांनी इटलीतील 'लो शो देई रेकॉर्ड' या टॅलेंट शोमध्ये अशाप्रकारे 42 नारळ फोडून दाखवले होते. आता त्यांनी एका मिनिटात 68 नारळ फोडून हा जुना विक्रम मोडला आहे.
गिनिज बुकच्या एक्स हँडलवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सैदालवी अत्यंत कुशलतेने हे नारळ फोडत असताना दिसून येतात. व्हिडीओमध्ये दिसते काही लोक काळ्या पोशाखात गोलाकार बसले असून ते आपल्या डोक्यावर एका पाठोपाठ एक असे नारळ ठेवत आहेत आणि सैदालवी हे नारळ ननचाकूने फोडत जात आहेत. ते कर्नाटकातील मद्दूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.