वॉशिंग्टन : सरड्यांमधील, विशेषतः शॅमेलियॉनसारख्या सरड्यांमधील रंग बदलण्याची क्षमता माणसाला नेहमीच थक्क करीत आली आहे, मात्र अशीच क्षमता असलेला एका मासाही निसर्गामध्ये आहे. या माशाची खासियत अशी की तो मृत्यूनंतरही आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणानुसार शरीराचा रंग बदलू शकतो!
वैज्ञानिकांनी 'हॉगफिश' नावाच्या या माशाचा शोध घेतला आहे. त्याला 'लॅचनोलाईमस मॅक्सिमम' असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. या संशोधनामुळे हॉगफिश माशाचा विकास, त्याचा नैसर्गिक अधिवास आणि अन्य व्यवहारांबरोबरच वेगाने रंगात बदल करण्याच्या क्षमतेबाबत अधिक जाणून घेण्यास मदत मिळेल. रंग बदलण्याची क्षमता ही मुळात एखाद्या प्राण्याला त्याच्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी मिळालेली देणगी असते. त्याचा उपयोग ते शिकार्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तसेच लपून राहून भक्ष्य पकडण्यासाठीही करू लागले.
या माशालाही रंग बदलण्याची क्षमता ही तापमानातील बदलांवर नियंत्रण ठेवणे, जोडीदाराला आकर्षित करणे आणि लपून राहणे यासाठी उपयूक्त ठरते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या माशांच्या शरीरातील 'क्रोमॅटोफोरस' या पेशींमध्ये रंगद्रव्य, क्रिस्टल किंवा छोटी परावर्तक प्लेट्स असतात. त्यामुळे ते रंग बदलू शकतात. सागरी खडकांमध्ये राहणारे हे मासे सर्वसाधारणपणे उत्तर कॅरोलिनापासून ब—ाझिलपर्यंत अटलांटिक महासागरात आढळतात. मृत्यूनंतरही ते आपला रंग बदलू शकतात ही बाब संशोधकांना अधिक आश्चर्यकारक वाटते.
माशाच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाशाच्या प्रभावाला निर्धारीत करण्यासाठी मायक्रोस्कोपीचा वापर करण्यात आला. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की या प्रक्रियेत त्वचेला रंग देणार्या क्रोमॅटोफोरच्या खाली 'एसडब्ल्यूएस1' नावाचे प्रकाश रिसेप्टर्स समाविष्ट असू शकतात. हे रिसेप्टर्स माशांना 'फीडबॅक' देतात की त्यांच्या त्वचेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कुठे आणि कसे परिवर्तन होत आहे. 'नेचर कम्युनिकेशन' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.