न्यूयॉर्क : जगभरात सी फूडचे लाखो चाहते आहेत. अशा खवय्यांना समुद्री जीव अधिक पसंत असतात. सी फूडमध्ये मासे, खेकडे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. माशांमध्ये देखील बरीच विविधता असते. असे खवय्ये आपापल्या आवडीनुसार, मासे खाणे पसंत करतात. काहींना पापलेट पसंत असतो तर काहींना सुरमई; पण समुद्रात एक मासा असाही असतो, जो अतिशय विषारी असतो आणि या माशाचा निव्वळ स्पर्श झाला तरी माणसाचा मृत्यू होऊ शकतो. या माशाचे नाव आहे स्टोन फिश.
स्टोन फिश असे नाव या माशाला कसे मिळाले, असा प्रश्न साहजिकच मनात येईल. या माशाला त्याच्या दिसण्यावरून हे नाव मिळाले आहे. या माशाचा आकार एखाद्या दगडासारखा असतो; पण हा अतिशय उपद्रवी मासा गणला जातो. कारण अगदी याचा स्पर्श झाला तरी माणसाचा मृत्यू होऊ शकतो.
या माशाची एक खासियत अशी की, तो नेहमी आपल्या शत्रूपासून दूर राहणे पसंत करतो. अगदी मच्छीमारांना देखील हाच सल्ला दिला जातो की, जर हा मासा दिसला तर त्यापासून तत्परतेने दूर गेले पाहिजे.
स्टोन फिश एखाद्या दगडासारखा असल्याने तो सहजासहजी दिसून येत नाही; पण एखादा जीव त्याच्या संपर्कात आला तर या माशाच्या शरीरातून न्यूरोटोक्सिन या विषाचा अक्षरश: फवारा होतो. हे विष इतके भयंकर असते की यामुळे काही क्षणातच जीवही जाऊ शकतो.