बँकॉक : 'सार्वजनिक स्वच्छतागृह' आणि 'स्वच्छता' यांचा किती संबंध असतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच एखादे सार्वजनिक स्वच्छतागृह इतके सुंदर आहे की ते एक पर्यटनस्थळही बनेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. थायलंडमध्ये एक सार्वजनिक स्वच्छतागृह असेच सुंदर आहे. चमकदार सोनेरी रंगातील Golden Public Toilet हे सुंदर स्वच्छतागृह आता सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियात एका महिलेने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, सोनेरी रंगाने सजलेला एक 'राजवाडा'च दिसतो आहे!. पण हा राजवाडा किंवा बंगला नसून, ते थायलंडमधील एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या आत जाताच सगळ्यात आधी महिला आणि पुरुष यांचे चित्र काढलेला बोर्ड तुम्हाला दिसेल. त्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी त्या मार्गावर बाहेर एका सोनेरी खांबावर 'महिला' असे लिहिलेलं तुम्हाला दिसेल. विविध नक्षीकाम करण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात अनेक वॉश बेसिन आणि मोठमोठे आरसे व पांढर्या रंगाचे पडदे लावलेले तुम्हाला दिसतील. Golden Public Toilet
समोर एक मोठे उद्यान आहे की, जे या सोनेरी स्वच्छतागृहाची शोभा वाढवताना दिसत आहे. आकर्षक वास्तू, अद्भुत कल्पना, राजेशाही थाट आणि सोनेरी रंग यांनी सजलेल्या या सार्वजनिक स्वच्छतागृहाची गोष्टच निराळी आहे. या व्हिडीओत सुरुवातीला एक तरुणी म्हणताना दिसत आहे की, मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की, मी कधी स्वच्छता-गृहाचासुद्धा व्हिडीओ शूट करीन; पण या स्वच्छतागृहाला बघून आज मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि हा व्हिडीओ तिने शूट करून, तिच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे; जो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. Golden Public Toilet