बीजिंग : काही हॉटेल, दुकान किंवा चहाच्या टपर्यांनाही निव्वळ स्थानमहात्म्यामुळे प्रसिद्धी मिळत असते. उत्तराखंडमधील माना येथील 'भारत की आखरी चाय की दुकान' असेच प्रसिद्ध आहे. ही चहाची टपरी चीनच्या सीमेजवळ आहे. अशीच एक चहाची टपरी तिच्या स्थानमहात्म्यामुळे प्रसिद्ध आहे. ही चहाची टपरी चक्क एका कड्यावर अधांतरी लटकते! तिथे जीव मुठीत धरूनच चहा पिण्यासाठी जावे लागते!
चीनच्या हुनान प्रांतातील झिन्युझाई नॅशनल जियोलॉजिकल पार्कमध्ये एका पर्वताच्या खड्या कड्यावर ही चहाची टपरी आहे. तब्बल 393 फूट उंचीवरील ही टपरी लोकांचे लक्ष वेधून घेते. खास गिर्यारोहकांसाठी ही चहाची टपरी तिथे निर्माण केलेली आहे. गिर्यारोहकांना घटकाभर विश्रांती घेण्यासाठी व चहा पिऊन ताजेतवाने होण्यासाठी ही सोय निर्माण केलेली आहे. या चहाच्या टपरीत स्नॅक्स, अल्पोपहार आणि काही गरजेच्या वस्तूही मिळतात. याठिकाणी चहा पिणे व वस्तूंची खरेदी करणे हा एक अनोखा अनुभव आहे. अर्थातच खास गिर्यारोहक मंडळीच हा अनुभव घेऊ शकतात.