अमेरिकेत सर्वात शक्तिशाली लेसर शस्त्र | पुढारी

अमेरिकेत सर्वात शक्तिशाली लेसर शस्त्र

वॉशिंग्टन : अमेरिकेत अमेरिकन सेना जगातील सर्वात शक्तिशाली लेसर शस्त्र बनवत आहे. हे लेसर वेपन सुमारे 300 किलोवॅटचे असून त्याची पुढील वर्षी चाचणी घेतली जाईल. जनरल अ‍ॅटामिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम आणि बोईंग कंपनीकडून हे शस्त्र विकसित केले जात आहे. ते एखाद्या जहाजाच्या कंटेनरच्या आकाराचे असेल व विशाल ट्रकवर ते तैनात केले जाईल. आतापर्यंत बनवण्यात आलेल्या लेसर वेपनमध्ये ते सर्वात शक्तिशाली असेल.

जनरल अ‍ॅटामिक्सचे अध्यक्ष स्कॉट फोर्ने यांनी सांगितले की हे शस्त्र आतापर्यंतचे सर्वात घातक असे लेसर शस्त्र असेल. अमेरिकेत अमेरिकन नौदलाने सर्वात प्रथम ‘लॉज’ नावाचे लेसर वेपन 2014 मध्ये बनवले होते. ते यूएसएस पेन्सवर तैनात करण्यात आले होते. त्यावेळी या शस्त्राची क्षमता 30 किलोवॅट इतकी होती.

बहुतांश सैन्यांमधील लेसर वेपन हे 30 ते 100 किलोवॅट क्षमतेची असतात. या शस्त्रांच्या मदतीने एखाद्या ड्रोन विमानाला क्षणार्धात पाडले जाऊ शकते. अमेरिकेने या शस्त्राची मारक क्षमता अनेक पटीने वाढवली आहे. सर्वसामान्यपणे हे शस्त्र अनेक प्रकारच्या फायबर लेसरवर आधारित असते.

एका बीममधून किरणे बाहेर पडतात आणि शत्रू खाक होऊन जातो. या नव्या लेसर वेपनमध्ये अनेक आरसे असून ते आपापसात जोडलेले आहेत. अशा प्रकारचे शक्तिशाली लेसर शस्त्र आगामी काळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन, फायटर जेट आणि हेलिकॉप्टरही नष्ट करू शकते.

Back to top button