डायनासोर च्या सर्वात मोठ्या सांगाड्याची ५२ कोटींना विक्री | पुढारी

डायनासोर च्या सर्वात मोठ्या सांगाड्याची ५२ कोटींना विक्री

पॅरिस : काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या ट्रायसेराटॉप्स डायनासोर च्या जीवाश्माचा शोध लावण्यात आला होता. 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीच्या या विशालकाय सांगाड्याला ‘बिग जॉन’ असे नाव देण्यात आले होते. एका लिलावात हे जीवाश्म 6.6 दशलक्ष यूरो म्हणजेच सुमारे 52 कोटी रुपयांना विकले गेले.

पॅरिसच्या ड्रौट लिलावकेंद्रात ‘बिग जॉन’ या डायनासोर सांगाड्याचा लिलाव करण्यात आला. हा सांगाडा साऊथ डकोटा येथे वॉल्टर डब्ल्यू. स्टीन बिल यांनी 2014 मध्ये शोधला होता. प्राचीन काळातील एक विशाल महाद्वीप असलेल्या ‘लारमिडिया’ मध्ये हे डायनासोर वावरत होते. हे महाद्वीप सध्याच्या अलास्का आणि मेक्सिकोच्या भागात होते.

उत्खननानंतर या डायनासोरचे जीवाश्म इटलीत ठेवण्यात आले आणि त्याचे अवशेष एकत्र जोडण्यात आले. त्यामुळे त्याचे रूप कसे होते हे स्पष्ट होत गेले. ‘बिग जॉन’ची कवटी 9 फूट लांब आणि साडेसहा फूट रुंदीची आहे. डायनासोरचा सांगाडा सुमारे 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण अवस्थेत आहे. यापूर्वीही डायनासोरच्या सांगाड्याची विक्रमी किमतीत विक्री झालेली आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये ‘स्टेन’ नावाच्या टायरॅनोसोरस रेस्क डायनासोरच्या सांगाड्याची 31.8 दशलक्ष डॉलर्समध्ये विक्री झाली होती. अर्थात अशा सांगाड्यांच्या लिलावाबाबत संशोधकांनी चिंताही व्यक्त केली आहे. जीवाश्मांचे नमुने अशा पद्धतीने खासगी मालकीकडे गेल्यावर संभाव्य वैज्ञानिक संशोधनाची हानी होऊ शकते असे अनेकांना वाटते.

Back to top button