मोतिबिंदूचा हृदयाशीही संबंध! | पुढारी

मोतिबिंदूचा हृदयाशीही संबंध!

सिडनी : मोतिबिंदूचा हृदयविकाराशीही संबंध असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हार्टअ‍ॅटॅक आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका मोतिबिंदूमुळे वाढतो, असे ऑस्ट्रेलियन संशोधकांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेंटर फॉर आय रिसर्चच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

संशोधक डॉ. मॅथ्यू गॉर्सकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मोतिबिंदूचा हृदयविकाराशी असलेला एक संबंध स्पष्ट झाला आहे. त्यामुळे रुग्णांनी वेळोवेळी आपल्या डोळ्यांची तपासणी केली पाहिजे असा निष्कर्षही निघाला आहे. विशेषतः जर व्यक्ती वृद्ध असेल आणि एखाद्या आजाराशी झगडत असेल तर असे करणे गरजेचे ठरते. तुम्ही किती आरोग्यसंपन्न आहात याचा संकेत यामधून मिळत असतो.

या संशोधनासाठी 1999 पासून 2008 पर्यंत पंधरा हजार अमेरिकन रुग्णांची एक पाहणी करण्यात आली. त्यांच्या डेटाचे आता विश्लेषण करण्यात आले. या रुग्णांचे वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक होते. यापैकी दोन हजार रुग्ण असे होते ज्यांच्यावर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या रुग्णांमध्ये अन्य कारणांमुळे मृत्यूचा धोका 13 टक्के होता.

ज्या रुग्णांमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती त्यांच्यामध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका 36 टक्के अधिक होता. डॉ. मॅथ्यू यांनी म्हटले आहे की अधिक तणाव किंवा नैराश्यात राहणार्‍या लोकांमध्ये मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो. मोतिबिंदू झाल्यावर धमन्या आकुंचित होतात व त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

Back to top button