भारताची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार! | पुढारी

भारताची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार!

नवी दिल्ली : भारतीय ईव्ही स्टार्टअप वझिरानी ऑटोमेटिव्हने देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक हायपर कार सादर केली आहे. सिंगल सीटच्या या कारचे नाव ‘एकॉन्क’ असे आहे. स्टार्टअपचा दावा आहे की ही जगातील सर्वाधिक वेग पकडणार्‍या इलेक्ट्रिक मोटारींपैकी एक आहे. या इलेक्ट्रिक कार चा वेग ताशी 309 किलोमीटर असून अवघ्या 2.54 सेकंदांमध्ये ही कार ताशी शून्य ते 100 किलोमीटरचा वेग धारण करू शकते.

एखाद्या ‘युफो’सारखा किंवा रेसिंग कारसारखाही या कारचा लूक आहे. कारचे वजन 738 किलो आहे. स्टार्टअपने या हायपरकारमध्ये ईव्ही स्टार्टअपसाठी नव्या इनोवेटिव्ह बॅटरी सोल्युशनचा वापर केला आहे. या सोल्युशनने पारंपरिक कॉम्प्लेक्स लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीचे स्थान घेतले आहे. या हायपर कारमध्ये डिको नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

त्यामध्ये बॅटरीला थेट हवेतूनच थंड ठेवण्याची क्षमता मिळते. त्यामध्ये लिक्विड कूलिंगची गरज भासत नाही. हे तंत्र इलेक्ट्रिक कारला हलकी, वेगवान आणि सुरक्षित बनवते तसेच तिच्या रेंजमध्येही वाढ करते. एकॉन्क हायपर कारचे इंजिन 722 हॉर्सपॉवरची ऊर्जा निर्माण करते.

Back to top button