म्यानमार मध्ये दहा कोटी वर्षांपूर्वीच्या खेकड्याचे जीवाश्म | पुढारी

म्यानमार मध्ये दहा कोटी वर्षांपूर्वीच्या खेकड्याचे जीवाश्म

रंगुन : म्यानमार च्या जंगलात एका झाडाच्या राळेत दहा कोटी वर्षांपूर्वीच्या खेकड्याचे जीवाश्म सापडले आहे. या शोधामुळे वैज्ञानिक उत्साहित असून एखाद्या ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे ही माहिती कुतुहल निर्माण करणारी ठरली आहे.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी तसेच यूनान, रेजिना, लिन, ड्यूक, येल आणि चायना युनिव्हर्सिटीच्या आठ संशोधकांचा या संशोधनात सहभाग आहे. झाडाच्या राळेत किंवा डिंकात प्राचीन काळातील जीव अडकून पडून ते तसेच टिकून राहतात. या पारदर्शक व घट्ट राळेला ‘अम्बर’ असे म्हटले जाते. आता अशाच राळेत अडकलेल्या आग्‍नेय आशियातील जंगलातील खेकड्यावरून अनेक गोष्टी दिसून आल्या आहेत. दहा कोटी वर्षांनंतरही या खेकड्याचे वंशज अद्याप तसेच दिसतात हेही यामधून समजले आहे.

सागरी जीवांच्या विकासाबाबत या शोधामुळे नवे संशोधन होऊ शकते. हे जीव जगात कसे विस्तारले याचाही यामुळे अभ्यास होईल. केवळ पाच मिलीमीटर आकाराचा हा खेकडा एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आहे. अशा राळेत आतापर्यंत केवळ कीटकच आढळून आलेले आहेत.

डायनासोरच्या काळातील या जीवाचा आता अनेक बाबतीत संशोधनासाठी उपयोग होईल. या खेकड्याचे डोळेल तोंड वगैरे अनेक अवयव अद्यापही सुरक्षित आहेत. हा खेकडा ‘क्राऊन यूब्राच्युरा’ किंवा ‘ट्रू क्रॅब्स’ म्हणून ओळखला जातो. हे खेकडे घरटी बनवून राहत असत. सध्याच्या ब्राच्युरन प्रजातीच्या खेकड्यांचा हा जवळचा नातेवाईक, पूर्वज आहे.

Back to top button