नासा च्या यानाने मंगळाभोवती पूर्ण केल्या ८८ हजार फेर्‍या - पुढारी

नासा च्या यानाने मंगळाभोवती पूर्ण केल्या ८८ हजार फेर्‍या

न्यूयॉर्क : ‘नासा’ चे एक यान गेल्या 20 वर्षांपासून ‘मंगळ’ ग्रहाची माहिती पुरवित आहे. हे यान आजही अव्याहतपणे आपले काम करतच आहे. या अंतराळ यानाचे नाव ‘मार्स ओडिसी स्पेसक्राफ्ट’ असे आहे. या यानाने आजपर्यंत मंगळाबाबत अनेकवेळा आश्‍चर्यकारक माहिती पुरविली आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ ने 7 एप्रिल 2021 रोजी फ्लोरिडास्थित ‘केनवरल एअरफोर्स स्टेशन’वरून मार्स ओडिसी एअरक्राफ्ट लाँच केले होते. तब्बल 9 महिन्यांची जटिल यात्रा पूर्ण करून हे यान 24 ऑक्टोबर 2001 रोजी मंगळावर पोहोचले. उल्लेखनीय म्हणजे हे यान गेल्या 20 वर्षांपासून मंगळाभोवती एकाच कक्षेत फिरत आहे. याशिवाय ते अविरतपणे कार्यरत असून, सातत्याने डेटाही पाठवत आहे.

मार्स ओडिसी अंतराळ यानाने गेल्या दोन दशकांत मंगळाभोवती 88 हजारांहून अधिक फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान त्याने 12 लाखांहून अधिक छायाचित्रे पाठविली आहेत. ही छायाचित्रे म्हणजे मंगळाबाबतच्या माहितीचा एक खजिनाच आहे.

मार्स ओडिसी यानाने मंगळाभोवती फिरत असतानाच सहा मंगळ मोहिमांसाठी अमेरिकेसह सहा देशांना मदतही केली आहे. आजपर्यंत या यानाने मंगळाबाबतचा 16 टेराबाईट इतका डेटा पाठविला आहे. 120 मिनिटांच्या 4 हजार चित्रपटांच्या डेटाइतका हा डेटा आहे. एक टेराबाईटमध्ये 3.10 लाख छायाचित्रे डाऊनलोड होऊ शकतात. हे यान 7.2 फूट लांब, 5.6 फूट उंच, 2.6 फूट रूंद असून, त्याचे एकूण वजन 729.7 किलो इतके आहे.

Back to top button