ला-पाल्मा ने झाले शहराचे राखेत रूपांतर | पुढारी

ला-पाल्मा ने झाले शहराचे राखेत रूपांतर

माद्रिद : स्पेनच्या ‘केनरी आयलँड’वर गेल्या एक महिन्यापासून ला-पाल्मा नामक ज्वालामुखी धगधगत असून, तो शांत होण्याचे नाव घेईनासा झाला आहे. हा ज्वालामुखी सातत्याने लाव्हा आणि राख ओकत आहे. ज्वालामुखीतून लाव्हारसाची नदी वाहत येऊन सध्या समुद्रात मिसळत आहे, तर बेटावर राखेचे पर्वत बनू लागले आहेत. याशिवाय लाव्हा शहरातही वाहू लागल्याने परिस्थिती अत्यंत भयावह आणि धोकादायक बनली आहे.

केनरी आयलँडवर असलेल्या शहरातील पेट्रोलपंपापर्यंत लाव्हा पोहोचला. मात्र, तत्पूर्वीच पंप रिकामा करण्यात आला. ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या लाव्हा, राख आणि धूर यामुळे अद्याप जीवित हानी झाल्याने वृत्त नसले तरी शहरात मात्र सर्वत्र विदारक द‍ृश्य नजरेस पडत आहे. शहरातील काही भागांत आजही काही जनावरे अडकली आहेत.

मात्र, त्यांना बाहेर काढणे अवघड बनू लागले आहे. यामुळे त्यांना एअरलिफ्ट करण्याची योजना आखण्यात येत आहे. ला-पाल्मा नामक हा ज्वालामुखी तब्बल 50 वर्षांनंतर गेल्या महिन्यात सक्रिय झाला. सुरुवातीला पाच ठिकाणांहून लाव्हा बाहेर पडत होता.

मात्र, आता तो अनेक ठिकाणांहून बाहेर पडत आहे. लाव्हारसाने शहरातील सुमारे 150 हून अधिक घरे गिळंकृत केली आहेत. रस्त्यांवर सर्वत्र लाव्हाने भिंती तयार झाल्या आहेत. दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललेल्या ला-पाल्मा ज्वालामुखीला ‘ला कँब्रे विएजा’ अथवा ‘द ओल्ड समिट’ या नावानेही ओळखले जाते.

Back to top button