ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण | पुढारी

ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण

न्यूयॉर्क : येथील डॉक्टरांनी एका ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण केले. त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी घेण्यात आली होती. या प्रत्यारोपणानंतरही त्याच्या शरीराचे सर्व अवयव योग्यप्रकारे काम करीत आहेत. किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया आशेचा नवा किरण घेऊन आली आहे.

न्यूयॉर्कच्या एन.वाय.यू. लँगून ट्रान्सप्लँट इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणासाठी वापरण्यात आलेली किडनी जेनेटिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एका डुकरातून मिळवण्यात आली होती. ती अशा पद्धतीची होती की मानवी शरीर नाकारणार नाही. सामान्य प्रत्यारोपण प्रक्रियेद्वारेच ही किडनी संबंधित रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली.

या प्रयोगावेळी रुग्णाला व्हेंटिलेटरच्या माध्यमातून जिवंत ठेवण्यात आले होते. हे प्रत्यारोपण एन.वाय. यू. लँगून ट्रान्सप्लँट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रॉबर्ट मोंटगोमरी यांनी स्वतः केले. त्यांनी सांगितले की किडनीला रुग्णाच्या रक्तवाहिन्यांशी जोडून शरीराच्या बाहेरच ठेवण्यात आले होते व तीन दिवस त्यावर लक्ष ठेवण्यात आले. या किडनीने जवळजवळ ती प्रत्यारोपित होताच काम सुरू केले होते. तिने लगेचच मूत्र आणि क्रिएटनिन बनवणे सुरू केले.

ज्या रुग्णामध्ये ही किडनी बसवण्यात आली त्याच्या किडनीने काम करणे बंद केले होते तसेच त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबीयांनी लाईफ सपोर्ट सिस्टीम हटवण्यास परवानगी दिली होती. मात्र, डॉक्टरांच्या आग्रहाने त्यांनी ही सिस्टीम हटवण्यापूर्वी प्रत्यारोपणाचा प्रयोग करण्यास परवानगी दिली.

Back to top button