यदाद्री मंदिराचे गोपूर १२५ किलो सोन्याने मढवणार - पुढारी

यदाद्री मंदिराचे गोपूर १२५ किलो सोन्याने मढवणार

हैदराबाद : तेलंगणाची भूमी प्राचीन काळापासूनच नृसिंह अवताराशी संबंधित क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आता तिथे श्री लक्ष्मी नृसिंहाचे भव्य यदाद्री मंदिर उभे राहत आहे. 2014 मध्ये आंध्र प्रदेशातून वेगळे झाल्यानंतर तेलंगणात तिरुपतीसारख्या प्रख्यात मंदिराची उणीव भासत होती.

त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने राज्याच्या भुवनगिरी जिल्ह्यात हे मंदिर बांधण्याचा उपक्रम सुरू केला. त्याचे बांधकाम आता जवळजवळ पूर्ण झाले असून आता त्याचे मुख्य शिखर किंवा विमान गोपूरम हे 125 किलो सोन्याने मढवले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सोने खरेदी करणार आहे.

मंदिर बांधकामाचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री राव यांनी सांगितले की मंदिरासाठी 125 किलो सोन्याची गरज भासणार आहे. त्याची किंमत 60 ते 65 कोटी रुपये असेल. आम्ही आरबीआयकडून सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. निधी जमा झाल्यानंतर हे सोने खरेदी केले जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रथम देणगीदार म्हणून 1 किलो 16 तोळे सोने दान केले.

त्यानंतर टीआरएसच्या अनेक आमदार आणि उद्योगपतींनी दान देण्याची घोषणा केली आहे. मंदिरात 39 किलो सोन्याने व 1753 टन चांदीने सर्व गोपुरे आणि भिंती मढवल्या जातील. मंदिराचे डिझाईन प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे कलादिग्दर्शक आनंद साई यांनी केले आहे.

या मंदिरात रोज दहा हजार भाविकांच्या भोजनाची व्यवस्था असेल. मंदिराजवळ 250 एकरांत टेम्पल सिटीही तयार होत आहे. हैदराबादपासून 60 किलोमीटरवर असलेल्या यदाद्री मंदिराचे काम 2016 मध्ये सुरू झाले होते. हे मंदिर 28 मार्च 2022 मध्ये भाविकांसाठी खुले होईल.

Back to top button