नॉन ओ या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका | पुढारी

नॉन ओ या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका

न्यूयॉर्क : हृदयासंबंधीचे आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. हा आजार दरवर्षी लाखोेंच्या संख्येने लोकांना प्रभावित करत आहे. खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि अन्य कारणांमुळे हृदयासंबंधीचे आजार निर्माण होतात. हृदयविकार हा जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण बनला आहे. अशा स्थितीत हा आजार होऊ नये, म्हणून कोणत्या लोकांना सावध राहणे गरजेचे आहे, हे महत्त्वाचे ठरते. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार ‘नॉन ओ’ रक्तगटाच्या लोकांनी अधिक सावध असणे गरजेचे आहे.

‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार ‘नॉन ओ’ रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता जास्त असते. ‘रक्तगटाचा प्रकार आणि हृदयविकार’ यासंदर्भात हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात सुमारे चार लाखांहून अधिक लोकांना सहभागी करवून घेण्यात आले होते. यामध्ये असे आढळून आले की, ‘ए’ आणि ‘बी’ रक्तगटाच्या लोकांना ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता आठ टक्के जास्त असते.

संशोधकांनी ‘ए’ आणि ‘बी’ रक्तगटांचीही तुलना केली. यामध्ये ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांना हार्टअ‍ॅटॅकचा जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनानुसार ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये ओ गटाच्या तुलनेत ‘मायोकार्डियल इन्फार्कशन’चा धोका जास्त असतो. याशिवाय ‘ए’ रक्तगटाच्या लोकांना ‘ओ’ रक्तगटाच्या तुलनेत 11 टक्के हार्टफेलचाही धोका जास्त असतो. मात्र, योग्यवेळी उपचार केल्याने रुग्णांवरील संकट दूर होते व तो आजारातून सावरतोही.

Back to top button