ऑस्ट्रेलियात किनारी दिसला एलियनसारखा अनोखा जलचर | पुढारी

ऑस्ट्रेलियात किनारी दिसला एलियनसारखा अनोखा जलचर

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील समुद्र किनार्‍यावर एलियनसारखा सागरी जीव आढळून आला आहे. या सागरी जीवाची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा विचित्र सागरी जीव नेमका कोणता आहे? हे ओळखणे शास्त्रज्ञांनाही शक्य झाले नाही. त्यांच्या मते, आजपर्यंत असा जीव कधीच पाहण्यात आलेला नाही. तर सोशल मीडियावर काही युजर्सनी हा सागरी जीव ‘जेलिफिश’ प्रजातीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

गुलाबी रंगाचा हा सागरी जीव ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथील हर्वे बेच्या उरंगन बीचवर आढळूून आला. ज्यावेळी तो नजरेस पडला, त्यावेळी तो वाळूत अडकला होता. नेमक्या याचवेळी त्याला कॅमेराबद्ध करण्यात आले. आता हेच छायाचित्र ऑस्ट्रेलियात चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. हा जीव म्हणजे एक जेलिफिश आहे, असे काही लोक म्हणत आहेत. तर काही लोकांनी तो ‘समुद्री स्लग’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, काही फेसबुक युजर्सनी हा जीव म्हणजे व्हेल अथवा शार्कच्या शरीराचा तुकडा असू शकतो, असे म्हटले आहे. तर नॅशनल जिओग्राफीच्या मते, एलियनसारखा दिसणारा हा प्राणी एक ‘नूडिब्रांच’ असू शकतो. हा एक जेली-बॉडी असून, तो समुद्राच्या तळाशी राहतो. नॅशनल जिओग्राफीच्या मते, आजपर्यंत नूडिब्रांचच्या दोन हजारांहून अधिक प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे.

Back to top button