न्यूयॉर्क : संशोधकांना तब्बल 25 हजार वर्षांपूर्वीच्या महिलेचा डीएनए मिळाला आहे. सैबेरियातील एका गुहेत सापडलेल्या पेंडंटवर हा डीएनए शोधण्यात आला. एखाद्या प्रागैतिहासिक काळातील दागिन्यावरील डीएनए बाजूला करण्यात प्रथमच संशोधकांना यश आले आहे. त्यासाठी नव्याने विकसित झालेल्या एक्सट्रॅक्शन मेथडचा वापर करण्यात आला.
याबाबतच्या संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2019 मध्ये संशोधकांना दक्षिण सैबेरियातील अल्ताई पर्वतराजीत असलेल्या डेनीसोव्हा गुहेत हे अंगठ्याच्या नखाइतक्या आकाराचे पेंडंट सापडले होते. ही गुहा 'डेनिसोव्हन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या मानव प्रजातीसाठी ओळखली जाते. आधुनिक मानवांचाही या गुहेशी संबंध आलेला आहे. तिथे अनेक जीवाश्म व डीएनए नमुने मिळालेले आहेत.
तिथे सापडलेले हे पेंडंट किंवा पदकही त्याबाबतीत उपयुक्त ठरले. 2 सेंटीमीटर लांबीच्या या पेंडंटवरून 25 हजार वर्षांपूर्वीच्या महिलेच्या डीएनएचा नमुना मिळवण्यात आला. हे पेंडंट म्हणजे हरणाचा दात असून त्याला छिद्र पाडलेले आहे. त्यामध्ये धागा ओवून तो गळ्यात बांधला जात असे. दातांवर मानवी डीएनएचे नमुने शिल्लक राहण्याची शक्यता अधिक असते. असे नमुने त्वचेच्या पेशींमधून किंवा घामाच्या थेंबांमधून उतरत असतात.