‘स्टार ट्रेक’ मधील अभिनेत्याचा ९० व्या वर्षी अंतराळ प्रवास - पुढारी

‘स्टार ट्रेक’ मधील अभिनेत्याचा ९० व्या वर्षी अंतराळ प्रवास

टेक्सास : ‘स्टार ट्रेक’ या मालिकेने अवघ्या जगाला अंतराळ क्षेत्राची गोडी लावली होती. आता या मालिकेतील विल्यम शॅटनर या 90 वर्षांच्या अभिनेत्याने अन्य तीन सहप्रवाशांसह अंतराळाचा प्रवास केला आहे. जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन न्यू शेफर्ड’ रॉकेटच्या सहाय्याने हे प्रवासी अकरा मिनिटांसाठी अंतराळ सफरीवर गेले. अंतराळ प्रवास करणारे शॅटनर हे सर्वात वृद्ध व्यक्‍ती ठरले आहेत.

‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीने अंतराळ प्रवास घडवण्याची ही दुसरी वेळ. तसेच ‘न्यू शेफर्ड’ या रॉकेटची ही 18 वी मोहीम. या मोहिमेत 90 व्या वर्षी अंतराळ प्रवास करण्याचे धैर्य शॅटनर यांनी दाखवले.

या अनुभवाची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘ब्लू ओरिजिन’चे संस्थापक बेजोस यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की जगातील प्रत्येकाला हा अनुभव मिळावा. हा अनुभव खरोखरच अविश्‍वसनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘न्यू शेफर्ड’ हे पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे रॉकेट आहे. पश्‍चिम टेक्सासमधील व्हॅन हॉर्न येथून या रॉकेटचे प्रक्षेपण झाले.

अकरा मिनिटांच्या या फ्लाईटदरम्यान प्रवाशांनी अंतराळात चार मिनिटे वजनरहीत अवस्था अनुभवली. गुरुत्वाकर्षण नसलेल्या स्थितीत तरंगण्याचा अनुभव त्यांनी घेतला. अंतराळात कॅप्सूलला सोडल्यानंतर रॉकेट वेगळे झाले होते. त्यानंतर सात मिनिटांनी या कॅप्सूलने लाँचपॅडपासून उत्तरेला तीन किलोमीटरवर पॅराशूटच्या सहाय्याने उभ्या स्थितीत लँडिंग केले.

अंतराळ प्रवास करणारी सर्वात वृद्ध व्यक्‍ती म्हणून यापूर्वी 82 वर्षांच्या वॅली फंक यांचा विक्रम होता. त्यांनी ब्लू ओरिजिनच्याच पहिल्या मोहिमेत जेफ बेजोस यांच्यासमवेत 20 जुलैला अंतराळ प्रवास केला होता. त्यांचा विक्रम आता शॅटनर यांनी मोडला आहे. शॅटनर यांनी ‘स्टार ट्रेक’ मध्ये कॅप्टन किर्क ही भूमिका साकारली होती. मोहिमेत त्यांच्यासमवेत ख्रिस बोशुझेन, ऑड्रे पॉवर्स आणि ग्लेन डी व्रीज हे होते.

Back to top button