बुरशी संक्रमणापासून ‘या’ प्रोटिनमुळे सुरक्षित असतात मगरी | पुढारी

बुरशी संक्रमणापासून ‘या’ प्रोटिनमुळे सुरक्षित असतात मगरी

मेलबोर्न : पृथ्वीवर लाखो वर्षांपासून मगरींच्या वेगवेगळ्या प्रजाती अस्तित्वात आहेत. अगदी डायनासोरच्या काळापासूनही मगरींचे या पृथ्वीतलावर अस्तित्व आहे. या दीर्घ प्रवासात मगरींनी रोगप्रतिकारक क्षमतेची नवी नवी वैशिष्ट्ये विकसित केलेली आहेत. त्यामुळेच दलदली किंवा पाण्याच्या अन्य ठिकाणांमध्ये राहत असतानाही त्यामधील हानिकारक सूक्ष्मजीवांपासून त्यांना धोका निर्माण होत नाही. आता याबाबत एक नवे संशोधन झाले असून त्याची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एक विशिष्ट प्रोटिन मगरींचे बुरशी संसर्गापासून संरक्षण करण्यास उपयुक्त आहे, असे दिसून आले. हे संशोधन मानवी आरोग्याच्या द़ृष्टीनेही नवे संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

या प्रोटिनच्या संरक्षणात्मक वैशिष्ट्यांवर अभ्यास करण्यात आला. हे प्रोटिन मगरींमध्ये संक्रमणशील आजारांशी लढण्यासाठी किंवा त्यांच्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. सध्या मानवी आरोग्यासाठी अँटिबायोटिक रोधक सूक्ष्मजीवांची समस्या गंभीर बनली आहे. असे सूक्ष्मजीव अँटिबायोटिक औषधांना दाद देत नाहीत व रोग बळावतो. अशा जीवाणूंना ‘सुपरबग’ असे म्हटले जाते. या समस्येवर मात करण्यासाठीही सध्या नवे नवे संशोधन होत आहे. आता मगरींवरील हे संशोधन उपयुक्त ठरू शकते. या मगरींमध्ये आढळलेले बचावात्मक प्रोटिन मानवासाठीही उपयुक्त ठरू शकते का हे पाहिले जात आहे. वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये आढळणारे असे ‘डिफेंसिन्स प्रोटिन’ आता अभ्यासाचा विषय बनलेले आहे.

वनस्पतींमध्ये असे प्रोटिन सर्वसाधारणपणे फुले व पानांमध्ये बनते. प्राण्यांमध्ये ते पांढर्‍या रक्तपेशी आणि म्युकस झडपांमध्ये म्हणजेच फुफ्फुसे व आतड्यांमधील झडपांमध्ये बनते. त्यांची भूमिका संक्रामक सूक्ष्मजीवांना नष्ट करून शरीराचे रक्षण करणे ही असते. अशा सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू, विषाणू, बुरशी आणि कर्करोगाच्या पेशींचाही समावेश होतो. घाणेरड्या पाण्यात राहूनही या प्रोटिनमुळेच मगरींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झालेली असते. खार्‍या पाण्यातील मगरींच्या जीनोमचा अभ्यास केल्यावर एक खास ‘डिफेंसिन्स’ असलेल्या ‘सीपीओबीडी 13’चा संशोधकांना छडा लागला. ते ‘कँडिडा एलबीकान्स’ नावाच्या बुरशीला प्रभावीपणे नष्ट करू शकते. ‘कँडिडा एलबीकान्स’ जगभरात मानवामध्ये बुरशीमुळे होणार्‍या आजारांचे मुख्य कारक आहे. आता त्यावर नवे संशोधन होऊन प्रभावी औषध मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

Back to top button