मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे पाहून लोक गहिवरले | पुढारी

मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे पाहून लोक गहिवरले

मॉस्को : सध्या सोशल मीडियावर मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे पाहून लोक गहिवरून जात आहेत. क्रिमियामधील अजोव समुद्राच्या किनार्‍यावर सध्या मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचा खच पडलेला दिसून येत आहे.

आतापर्यंत सात हजारांहून अधिक काळ्या मानेचे ग्रीब्स, समुद्री कबूतर मरण पावले आहेत. ‘क्रिमियन फेडरल युनिव्हर्सिटी’चे ग्रिगोरी प्राकोपोव यांच्या मते, मोठ्या प्रमाणात पक्षी मरण पावले असून, त्यांचा आकडा हजारोेंच्या घरात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या व्हायरसचा संसर्ग हा पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. ज्यांचे तांत्रिका तंत्र खराब झाले होते, ते पक्षी सुरुवातीला गोल गोल फिरतात आणि त्यानंतर ते मृत्युमुखी पडतात. या क्षणाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

प्रोकोपोव यांनी सांगितले की, हे पक्षी विषामुळे मेले असतील, याची काहीच शक्यता नाही. मात्र, आजारी पडल्यानंतर मृत्यू झालेल्या पक्ष्यांचा व्यवहार समजून घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. या पक्ष्यांच्या मृत्यूस एखादा व्हायरस जबाबदार असण्याची शक्यता आहे. मात्र, यासंबंधी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

दरम्यान, स्थानिक लोकांनी हजारो पक्ष्यांच्या मृत्यूस उच्चस्तरीय प्रदूषण हेच जबाबदार आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, पक्ष्यांच्या मृत्यूपूर्वी या भागाच्या हवामान संशोधनात उच्चस्तराच्या मरक्यूरीचे संकेत देण्यात आले होते. सध्या विशेषज्ञ मृत पक्ष्यांचा अभ्यास करत आहेत.

Back to top button