डायनासोरच्या अनोख्या प्रजातीचा शोध | पुढारी

डायनासोरच्या अनोख्या प्रजातीचा शोध

लंडन : वैज्ञानिकांनी डायनासोरच्या अनोख्या प्रजातीचा शोध लावला आहे. या डायनासोरच्या शरीरावर अतिशय विचित्र दिसणारी व सांगाड्याशी जोडलेली टोकदार हाडे होती. या काटेदार आवरणामुळे हा डायनासोर अतिशय वेगळा दिसत होता. जीवाश्म संशोधकांनी डायनासोरच्या सर्वात जुन्या आणि अतिशय वेगळ्या समूहाच्या या अवशेषांचा शोध घेतला आहे.

या समूहाला ‘अँकिलोसॉर’ असे नाव असून मोरोक्कोमध्ये अशा प्रकारच्या डायनासोरच्या जीवाश्मांचा प्रथमच शोध घेण्यात आला आहे. हे डायनासोर ‘स्पायकोमेलस अ‍ॅफर’ प्रजातीशी संबंधित होते. त्यांना असामान्य ‘बोन आर्मर’ म्हणजेच अस्थिकवचासाठी ओळखले जात होते. ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्युशन’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की 16 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीच्या अशा डायनासोरमध्ये शरीरावरील टोकदार बाह्य आवरण होते. ही टोकदार हाडे आतापर्यंत कोणत्याही प्रजातीमध्ये आढळलेली नाहीत. लंडनच्या नॅशनल हिस्टरी म्युझियमच्या संशोधकांनी या जीवाश्माचे छोटे हिस्से जोडून त्याचे अध्ययन केले.

त्यानंतर त्यांची कालगणना केली. जीवाश्म संशोधिका डॉ. सुसान मेडमेंट यांनी सांगितले की हा डायनासोर अतिशय अजब होता. सर्वसाधारणपणे एखाद्या डायनासोरचे अस्थिकवच त्याच्या त्वचेशी जोडलेले असते, सांगाड्याशी नाही. मात्र, या डायनासोरचे अस्थिकवच त्याच्या फासळ्यांशीही जोडलेले होते.

Back to top button