नर डास का फिरतात माणसाभोवती? - पुढारी

नर डास का फिरतात माणसाभोवती?

लंडन : कानाजवळ होणारी डासांची भुणभुण अतिशय त्रासदायक असते. मात्र, आपल्याला दंश करण्यासाठीच ते आपल्याजवळ आलेले असतात असे नाही. विशेषतः नर डास हे माणसाचे रक्त पित नाहीत. माणसाचे रक्त शोषून त्याला मलेरिया, झिका, डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजाराने संक्रमित करण्याचे काम मादी डास करीत असतात. मग नर डास माणसाभोवती का फिरत असतात, याबाबत संशोधकांनी एक अध्ययन केले आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की डास सुमारे दहा मीटरच्या अंतरावरूनच माणसाला शोधून काढत असतात. त्याचे कारण आहे कार्बनडाय ऑक्साईड. श्वासोच्छ्वासावेळी माणूस ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. डास या कार्बनडाय ऑक्साईडचा स्रोत कुठे आहे हे शोधत माणसापर्यंत येतात आणि दंश करतात.

अर्थात चावण्याचे काम मादी डासच करतात, नर डास आपली भूक भागवण्यासाठी फुलांच्या रसावर निर्भर असतात. हे नर जरी माणसाचे रक्त शोषत नसले तरी त्रास देण्यात ते माद्यांपेक्षा कमी नसतात.

‘जर्नल ऑफ मेडिकल अँटोमोलॉजी’मध्ये प्रकाशित एका माहितीनुसार आतापर्यंत असे मानले जात होते की नर डास माणसाला चावत नसल्याने ते माणसाच्या अवतीभोवती फिरतही नाहीत. मात्र, हा समज चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. नरही माणसाभोवती फिरतात. त्यासाठी संशोधकांनी एडिज इजिप्टी या प्रजातीच्या डासांवर एक प्रयोग केला.

एका यार्डात या प्रजातीच्या केवळ नरांना सोडण्यात आले व कॅमेर्‍याच्या मदतीने त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. संशोधनात आढळले की नर डासही माणसाकडे आकर्षित होतात. माद्या रक्त शोषून घेताच दूर उडून जातात.

नर डास माणसाभोवती फिरत असले तरी क्वचितच एखाद्या ठिकाणी बसतात. ते माणसाच्या आसपास फिरण्याचे कारण माद्यांना शोधणे हे असू शकते. सर्वसाधारणपणे माद्या रक्तासाठी माणसाजवळ फिरत असतात. त्यामुळे नरही प्रजननासाठी त्यांना शोधण्यासाठी माणसाजवळ फिरतात. मात्र, याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.

Back to top button