हृदय, मेंदूच्या आरोग्यासाठी मत्स्याहार ठरतो लाभदायक | पुढारी

हृदय, मेंदूच्या आरोग्यासाठी मत्स्याहार ठरतो लाभदायक

पॅरिस : शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये हृदय आणि मेंदूचा समावेश होतो. या अवयवांनी योग्य आणि नियमित कार्य करत राहणे आपल्या जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. निरोगी हृदय आणि निरोगी मेंदूसाठी योग्य आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की माशांचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे आजार दूर राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा मासे खाल्ल्याने स्ट्रोकसारख्या आजारांपासूनही बचाव होतो.

या संशोधनानुसार, अमेरिकेत दर पाचपैकी एक मृत्यू मेंदूतील रक्ताच्या कमतरतेमुळे होतो. तज्ज्ञांच्या मते, मासे हे असे अन्न आहे जे मेंदूला तीक्ष्ण ठेवते आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे मेंदूची शक्ती, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी संजीवनीप्रमाणे काम करतात. मासे खाल्ल्याने स्मृतिभ्रंश आणि स्ट्रोक यासारख्या मेंदूच्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. नियमित मासे खाल्ल्याने वृद्धत्वामुळे होणारे मानसिक आजार कमी होऊ शकते.

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध मासे खाल्ल्याने हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतात. संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा मासे खातात, त्यांना मेंदूचे विकार होण्याचा धोका कमी होता. फ्रान्समधील बोर्डो विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. सेसिलिया समेरी यांनी सांगितले की त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष अतिशय प्रभावी आहेत. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी मासे हे सर्वोत्तम अन्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button