पनामाच्या जंगलात दिसला ‘लिओनार्डो डी कॅप्रियो’! | पुढारी

पनामाच्या जंगलात दिसला ‘लिओनार्डो डी कॅप्रियो’!

वॉशिंग्टन ः ‘टायटॅनिक’ चित्रपटामुळे लिओनार्डो डी कॅप्रियो हा हॉलीवूडचा अभिनेता जगप्रसिद्ध बनलेला आहे. हा सुपरस्टार पनामाच्या जंगलात काय करण्यासाठी गेला होता, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अर्थात खरा लिओनार्डो जंगलात गेला नव्हता तर त्याचे नाव ज्या सर्प प्रजातीला दिलेले आहे त्या प्रजातीमधील एक रंगीबेरंगी साप आता या जंगलात आढळून आला आहे!

पनामातील डोंगर पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात हा अंबर रंगाचा आणि गोलाकार, मोठे तपकिरी डोळे असलेला साप आढळून आला. या जंगलाच्या परिसरात सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणी आहेत. त्यामुळे असे साप व अन्यही जीवांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जाते. संशोधक अलेजांड्रो आर्टेगा यांनी सांगितले की या परिसरात अनेक नव्या प्रजाती सापडू शकतात.

त्यामुळे असा सर्प दिसणे हे केवळ हिमनगाचे एक टोक पाहिल्यासारखेच आहे. लियोनार्डो डी कॅप्रियो केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार्‍या व्यक्तींपैकी एक आहे. त्यामुळे या सापाला ‘सिबॉन इर्मेलिनडीकॅप्रियोई’ असे नाव दिलेले आहे. खरे तर हा साप लियोनार्डोच्याच नव्हे तर त्याच्या इच्छेनुसार त्याची आई इर्मेलिन इंडेनबिर्केन यांच्या नावाने ओळखला जातो. हा साप 15 इंच लांबीचा असतो आणि जमिनीपासून 10 फूट उंचीवर पाम वृक्षावर राहतो.

Back to top button