pyramid : पिरॅमिड बांधले त्यावेळी कसे दिसत होते? | पुढारी

pyramid : पिरॅमिड बांधले त्यावेळी कसे दिसत होते?

कैरो ः गिझाच्या वाळवंटी भागात प्राचीन इजिप्तमधील पिरॅमिड उभे राहिले. मानवाचे थक्क करणारे अभियांत्रिकी कौशल्य दर्शवत हे पिरॅमिड हजारो वर्षांपासून उभे आहेत. प्राचीन फेरोंचे म्हणजेच इजिप्शियन राजांचे मकबरे असणारे हे पिरॅमिड आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहेत. हजारो वर्षांच्या काळात या पिरॅमिडचे रूप बर्‍याच अंशी बदललेले आहे. लुटालूट, साहित्याची पळवापळव व हवामान अशा अनेक कारणांचा हा परिणाम. गिझामध्ये किंवा अन्यत्र उभे राहिलेले पिरॅमिड मुळात आज दिसतात तसे वाळूच्या तपकिरी रंगात नव्हते. ते चमकदार गाळाच्या खडकांनी आच्छादित केलेले होते.

झेक प्रजासत्ताकमधील प्रागच्या चार्ल्स युनिव्हर्सिटीतील संशोधक मोहम्मद मेगाहेद यांनी सांगितले की सर्व पिरॅमिड सुरुवातीच्या काळात अतिशय सुबक व सफेद चुनखडीच्या शिळांनी सजलेले होते. इजिप्तमधील स्वच्छ सूर्यप्रकाशात अशा गुळगुळीत, सफेद दगडांनी आच्छादित पिरॅमिड चांदीसारखे चमकत असत. एकट्या गिझाच्या ग्रेट पिरॅमिडसाठीच 6.1 दशलक्ष टन चुनखडीच्या शिळांचा वापर करण्यात आला होता. स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियममध्ये अशा मूळ चुनखडीच्या शिळा ठेवण्यात आलेल्या आहेत. ‘द ग्रेट पिरॅमिड’ किंवा ‘खुफूचा पिरॅमिड’ हा इसवी सनपूर्व 2552 ते 2528 या काळातील फेरो खुफूच्या नावाचा आहे.

गिझामधील सर्व पिरॅमिडपैकी हाच सर्वात जुना व सर्वात मोठा पिरॅमिड आहे. मात्र, त्याचे हे सजावटीचे दगड कालांतराने उदयास आलेल्या सत्ताधीशांनी काढून ते अन्य कामांसाठी वापरले. इसवी सन पूर्व 1336 ते 1327 या काळातील तुतानखामेनपासून ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत या पिरॅमिडचे दगड अशा कारणासाठी काढले गेले. मात्र, तरीही गिझाच्या पिरॅमिडमध्ये काही मूळ चुनखडीचे दगड शिल्लक आहेत. खाफ—ेच्या पिरॅमिडच्या वरील भागात ते आजही पाहायला मिळतात. हा फेरो खाफ—े इसवी सनपूर्व 2520 ते 2494 या काळात सत्ताधीश होता.

Back to top button