पत्नीला पाठीवर घेऊन पळण्याची शर्यत; विजेत्याला इनामही हट के | पुढारी

पत्नीला पाठीवर घेऊन पळण्याची शर्यत; विजेत्याला इनामही हट के

हेलसिंकी : जगभरात अनेक प्रकारच्या शर्यती आयोजित केल्या जातात. त्यातील काही शर्यती खरोखरच लक्षवेधी ठरतात. फिनलंडमध्ये अशीच एक शर्यत गेल्या काही वर्षांपासून अतिशय लोकप्रिय ठरत चालली आहे. वाईफ कॅरिंग रेस फिनलंड असे या शर्यतीचे नाव आहे. पत्नीला पाठीवर घेऊन ठरलेले अंतर कापायाचे असे त्याचे स्वरूप. विशेष म्हणजे जगभरातून हौशे-गौशे यात भाग घेण्यासाठी फिनलंडला खास हजेरी लावतात.

1992 मध्ये याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून या शर्यतीची लोकप्रियता वाढतच चालली आहे. मेट्रो वेबसाईटवर याचे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. शर्यतीत भाग घेतलेल्या पुरुषाच्या कंबरेला बेल्ट बांधला जातो. पत्नीला कशाप्रकारे पाठीवर घेऊन तुम्ही पळावे यासाठी कोणताही नियम नाही. तथापि, पळणे सुलभ व्हावे, यासाठी पुरुष मंडळी आपल्या पत्नीला उलट्या पद्धतीने पाठीवर घेऊन धावतात. या शर्यतीत सामील होण्यासाठी नवरोबाचे वय 17 हून अधिक निश्चित करण्यात आले आहे.

तसेच पत्नीचे वजन किमान 49 किलो असले पाहिजे, असाही नियम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जगभरातील जोडपी या शर्यतीत भाग घेण्यासाठी फिनलंडला येत असतील तर विजेत्याला बक्षीस म्हणून काय दिले जाते. तर त्याचे उत्तर असे आहे की, विजेत्या पुरुषाला त्याच्या पत्नीच्या वजनाएवढी बीअर इनाम म्हणून दिली जाते. आता तर ही शर्यत फिनलंडपुरती सीमित राहिलेली नसून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनीसह अन्य देशांतही अशी अनोखी शर्यत आयोजित करण्यात येते.

Back to top button