तब्बल 357 किलोमीटर लांबीचा कालवा! | पुढारी

तब्बल 357 किलोमीटर लांबीचा कालवा!

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या कालव्यांमध्ये आपल्याच देशातील एका कालव्याचा समावेश होतो. गुजरातमधील या ‘कच्छ ब्रँच कॅनल’ची लांबी तब्बल 357.18 किलोमीटर आहे. हा कालवा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर नर्मदा धरणापासून गुजरातच्या मांडवी तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मोद कुबापर्यंत जातो.

सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी या कालव्याचे वर्णन ‘जगातील सर्वात लांब शाखा कालवा’ असे केले आहे. ही योजना 2008 च्या आसपास सुरू झाली होती आणि 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालव्याचे उद्घाटन झाले. हा कालवा 6493 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आला आहे. शाखा कालव्याचे काम मे 2022 मध्येच पूर्ण झाले; पण त्यामधील पाण्याचे वितरण करण्यासाठीचे जाळे निर्माण करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या कालव्यांचे काम सुरू आहे ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

छोट्या कालव्यांचे हे एकूण 5 हजार किलोमीटर लांबीचे जाळे असून त्यापैकी 1200 किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. या शाखा कालव्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकर्‍यांना मोठाच लाभ होणार आहे. हा कालवा 1,12,778 हेक्टरच्या कृषी क्षेत्रातील 182 गावांमधील शेतीसाठी पाणी उपलब्ध करील. तसेच कच्छ जिल्ह्यातील सर्व 948 गावे आणि 10 छोट्या शहरांना हा कालवा पिण्याचे पाणी उपलब्ध करून देईल. या कालव्यामुळे नर्मदेचे पाणी आता अनेक गावागावांमध्ये पोहोचले आहे.

Back to top button