इटालियन पिझ्झाचा देशी ‘कुल्हड’ अवतार! - पुढारी

इटालियन पिझ्झाचा देशी ‘कुल्हड’ अवतार!

सुरत ः परदेशातून आलेले आणि भारतीयांच्या जीभेवर ठाण मांडून बसलेले अनेक खाद्यपदार्थ आहेत. त्यामध्येच पिझ्झाचाही समावेश होतो. पिझ्झा हा मूळचा इटालियन पदार्थ. खेड्यापाड्यातून शहरात रोजगारासाठी आलेल्या कामगारांची एक वेळेची भूक भागवणारा पदार्थ म्हणून तो सुरुवातीला रस्त्याकडेच्या गाड्यांवर विकला जात असे. त्यानंतर तो शाही घराण्यांमध्येही लोकप्रिय झाला व जगभर पसरला. आता या पदार्थाला गुजरातमधील एका माणसाने ‘देसी टच’ दिला आहे. त्याने चक्‍क कुल्हड म्हणजेच मातीच्या मडक्यातून पिझ्झा विकण्यास सुरुवात केली आहे!

सुरतच्या एका स्ट्रीट-साईड फूड स्टॉलवर मातीच्या कुल्हडमधील हा पिझ्झा मिळतो. देशात पिझ्झाशी संबंधित असा हा पहिलाच प्रयोग आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. कुल्हडमधील पिझ्झा पाहून लोक थक्‍क होत आहेत. रबडी, आइस्क्रीम किंवा बंगाली ‘मिष्टी दोही’ (गोड दही) खावे अशा पद्धतीने या कुल्हडमधील पिझ्झा चमच्याने खायचा! त्याच्या व्हिडीओला आतापर्यंत वीस लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा अनोखा पिझ्झा सुरतमधील प्रसिद्ध स्नॅक्स आऊटलेट ‘कोन चाट’ने लाँच केला आहे. हा पिझ्झा पाहून भारतीयांची कल्पकता दिसते असे काहींना वाटते! कुल्हडमधील पिझ्झा पाहून इटालियन लोकही खूश होतील असे एका यूजरने म्हटले आहे.

Back to top button