सिगारेटचे थोटूक ठरले 55 हजारांच्या दंडाचे कारण | पुढारी

सिगारेटचे थोटूक ठरले 55 हजारांच्या दंडाचे कारण

धूम्रपान रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. तरीदेखील धूम्रपान करणार्‍यांची संख्या जगभरात मोठी आहे. धूम्रपान करणार्‍या एका ब्रिटिश व्यक्तीला नुकताच 55,000 रुपयांपेक्षाही अधिक दंड ठोठावण्यात आला. अ‍ॅलेक्स डेव्हिस असे त्याचे नाव आहे. सिगारेट ओढल्यावर त्याने शिल्लक राहिलेली थोटके रस्त्यावरच टाकली. त्याचे हे वर्तन रस्त्यावरील तेथील स्वच्छता नियमन अधिकार्‍यांनी पाहिले. त्यांनी त्याला या कृत्याबद्दल हटकलेसुद्धा. तथाप, त्याने दुर्लक्ष केले.

परिणामी कचरा टाकल्याबद्दल त्याला दंडाची नोटीस ठोठावण्यात आली. त्याने आपली सिगारेट थॉर्नबरी, ग्लुसेस्टरशायर येथे 20 मीटर अंतरावर कौन्सिल अधिकार्‍यांसमोर टाकली आणि तो तिथून निघून गेला. त्यामुळे सुरुवातीस त्याला 15,000 रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याने या आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर त्याला एकूण 55,603 च्या पीडित अधिभारासह दंड भरण्याचे आदेश देण्यात आले. पर्यावरण विभागाचे कॅबिनेट सदस्य, कौन्सिलर रॅचेल हंट यांनी सांगितले की, सिगारेटची थोटके धोकादायक असतात. त्यातील घटकांचे विघटन होण्यासाठी 18 महिने ते 10 वर्षे लागतात.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमानुसार सिगारेटचे थोटूक हे जगभरात सर्वात जास्त टाकून दिले जाणारा कचरा असून तो दरवर्षी अंदाजे 766.6 दशलक्ष किलोग्रॅम विषारी कचरा बनवते.

दरवर्षी, तंबाखू उद्योग सहा ट्रिलियन सिगारेट्स तयार करतो. त्याचे सेवन जगभरात एक अब्ज लोक करतात. या सिगारेटमध्ये सेल्युलोज एसीटेट फायबर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मायक्रोप्लास्टिक्सपासून बनलेले फिल्टर असतात. सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांसारख्या घटकांमुळे ते तुटतात. त्याद्वारे मायक्रोप्लास्टिक्स, जड धातू आणि इतर अनेक रसायने वातावरणात सोडली जातात. परिणामी पर्यावरणातील अनेक घटक त्यामुळे बाधित होतात, असे निरीक्षण पर्यावरणाच्या अभ्यासकांनी नोंदविले आहे.

Back to top button