शाही मकबर्‍याचा इजिप्तमध्ये शोध | पुढारी

शाही मकबर्‍याचा इजिप्तमध्ये शोध

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांनी लक्सरजवळ 3500 वर्षांपूर्वीच्या एका शाही थडग्याचा शोध लावला आहे. प्राचीन इजिप्तवर ज्यावेळी हात्शेपसूट नावाची महिला फेरो किंवा राणी राज्य करीत होती, त्या काळातील हा मकबरा असावा असे संशोधकांना वाटते. त्यावेळी अल्पवयीन फेरो ‘तुतमोस-3’ याच्यासमवेत या राणीची सत्ता होती.

इजिप्तच्या पुरातत्त्व संशोधकांनी इंग्लंडच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांच्या सहकार्याने याबाबतचे संशोधन केले. लक्सरजवळील ‘वादी गब्बनत अल-कुरुद’ नावाच्या ठिकाणी संशोधन करीत असताना हा मकबरा सापडला होता. ‘व्हॅली ऑफ किंग्ज’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणापासून हे ठिकाण जवळच आहे. इसवी सनपूर्व 1479 मध्ये ‘तुतमोस-3’ हा राजा वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षीच राजसिंहासनावर आला. त्याची सावत्र आई असलेली हात्शेपसूट ही त्याची ‘रिजंट’ म्हणून काम करीत होती.

त्यानंतर ती तिच्या इसवी सन पूर्व 1458 मध्ये झालेल्या मृत्यूपर्यंत ती ‘सह-सत्ताधीश’च होती. या दोघांच्या सत्तेच्या काळातच देअर अल-बहरी येथील मंदिराचे काम झाले. आता सापडलेल्या मकबर्‍यात अनेक दफनस्थळे आहेत. या मकबर्‍यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या असाव्यात असे दिसून आले आहे. हा मकबरा नेमका कुणाचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र तेथील सजावट, अनेक दालने पाहता हा शाही मकबरा असावा हे स्पष्ट होते.

Back to top button