मंगळावरून आलेल्या उल्केत जैविक संयुगांचे मोठे वैविध्य | पुढारी

मंगळावरून आलेल्या उल्केत जैविक संयुगांचे मोठे वैविध्य

वॉशिंग्टन ः बारा वर्षांपूर्वी पृथ्वीवर मंगळावरून आलेली एक उल्का कोसळली होती. त्यावेळेपासूनच या उल्केचा अभ्यास सुरू असून नवे नवे संशोधनही होत आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की या उल्केत जैविक संयुगांचेही प्रचंड वैविध्य आहे. त्यापैकी एक संयुग तर असे आहे जे खुद्द मंगळावरही यापूर्वी पाहण्यात आलेले नाही! मंगळ हा ग्रह कधी काळी राहण्यास योग्य होता का, तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व होते का, हे तपासून पाहण्यासाठी याबाबतचे संशोधन सहायक होणार आहे.

18 जुलै 2011 मध्ये मोरोक्कोमधील ‘टिसिंट’ येथील आसमंतातून ही उल्का कोसळली. अर्थात त्यापूर्वी तिचे अनेक तुकडे झाले होते व ते मोरोक्कोच्या वाळवंटात इतस्तः विखुरले गेले. ही उल्का त्यापैकीच एक आहे. तिला ‘टिसिंट उल्का’ असेच नाव देण्यात आलेले आहे. लाखो वर्षांपूर्वी ही उल्का म्हणजे मंगळ ग्रहाचा एक भाग होता. मंगळावरून तुटून ती अंतराळात विखुरली गेल्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आली व पृथ्वीच्या दिशेने खेचली गेली. पृथ्वीच्या वातावरणात येताच ती जळाली व तिचे काही तुकडे पृथ्वीवर पडले. मंगळावरून पृथ्वीवर आलेल्या अशा पाच ज्ञात उल्का आहेत.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उल्केत किमान पाच प्रकारच्या जैविक संयुगांचे अस्तित्व असल्याचे तिच्या नमुन्याच्या पृथःकरणातून स्पष्ट झाले आहे. मंगळभूमीवर अनेक रोव्हर असून त्यांनी मंगळावरील खडकांचे जे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण केले होते, त्यामध्येही जे संयुग आढळले नाही तेही या उल्केत आहे हे विशेष! ‘ऑर्गेनिक कम्पाऊंडस्’ म्हणजेच जैविक संयुगे हे असे पदार्थ आहेत.

ज्यामध्ये कार्बणचे अणू हे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फरसारख्या एक किंवा अनेक घटकांच्या अणूंशी जोडलेले असतात. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जीवसृष्टीत असे अणू असतात हे विशेष. अर्थात काही जैविक संयुगे ही अजैविक प्रक्रियेतूनही बनत असतात. त्यामुळे मंगळावरील उल्केत बनलेली ही संयुगे तेथील एकेकाळी असलेल्या जीवसृष्टीचेच संकेत देणारे आहेत का हे आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही.

Back to top button