दीड लिटर कोल्ड्रिंक फक्‍त १० मिनिटांत फस्त; पण... | पुढारी

दीड लिटर कोल्ड्रिंक फक्‍त १० मिनिटांत फस्त; पण...

न्यूयॉर्क : उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक पिणे ही एक सर्वसाधारण बाब आहे. मात्र, कोल्ड्रिंक नियंत्रणात पिलेले बरे असते; अन्यथा प्रमाणापेक्षा जास्त पिल्यास जीवावरही बेतू शकते. नुकताच याचा प्रत्यय चीनमध्ये आला. तेथे एका 22 वर्षीय तरुणाचा कोल्ड्रिंक पिल्याने मृत्यू झाला. प्रमाणापेक्षा जास्त कोल्ड्रिंक पिल्याने प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र, अठरा तासांच्या प्रयत्नानंतही डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.

चीनमधील हा तरुण होरपळणार्‍या तापमानाने त्रस्त बनला होता. यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून त्याने अवघ्या 10 मिनिटांत एका कंपनीचे तब्बल दीड लिटर कोल्ड्रिंक फस्त केली.

एकाचवेळी इतके कोल्ड्रिंक पिल्याने त्याच्या हृदयाचे ठोके एकदम वाढले. तसेच रक्‍तदाबही वेगाने कमी झाला. ज्यावेळी गंभीर अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी तो जोरजोराने श्‍वास घेत होता.

यासंदर्भात मिरर यूकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार एकाच वेळी प्रमाणापेक्षा जास्त कोल्ड्रिंक पिल्याने तरुणाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात गॅस तयार झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की सीटी स्कॅन केल्यानंतर तरुणाच्या आतड्यांमध्ये गॅस तयार झाला होता. यामुळे लिव्हर पूर्णपणे खराब झाले, यामुळेच अवघ्या 18 तासांत दुर्देैवाने तरुणाने आपला प्राण गमावला. या घटनेतून कोल्ड्रिंक प्रमाणात प्यावे हेच सिद्ध होते.

Back to top button