फ्रीजशिवायही आता इन्सुलिन सुरक्षित - पुढारी

फ्रीजशिवायही आता इन्सुलिन सुरक्षित

नवी दिल्ली : ‘मधुमेह’ असलेल्या रुग्णांसाठी ‘ब्लड शुगर लेव्हल’ नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी बहुतेक रुग्ण औषधे अथवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतात. मात्र, ज्यावेळी रुग्णांना प्रवास करावयाचा असतो त्यावेळी इन्सुलिन सोबत घेऊन जाण्यात समस्या निर्माण होतात. कारण इन्सुलिनला थंड तापमानात ठेवण्याची गरज असते.

इन्सुलिनला लांब अंतराच्या प्रवासावर घेऊन जाण्यात येणारी समस्या दूर करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. त्यांनी अशा इन्सुलिनची निर्मिती केली की, त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजच भासत नाही. मधुमेही रुग्णांना प्रवासादरम्यान हे इन्सुलिन फारच उपयोगी ठरणार आहे. हे इन्सुलिन थरमोस्टेबल (रूम टेम्परेचरवर सुरक्षित) असेल.

कोलकाता येथील ‘बोस इन्स्टिट्यूट’ व ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी’चे दोन शास्त्रज्ञ व हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या दोन शास्त्रज्ञांनी संयुक्‍तपणे प्रयत्न करून हे इन्सुलिन तयार केले आहे. ‘इंटरनॅशनल सायन्स जर्नल’मध्ये या संशोधनासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

संशोधक शुभरांगसू चटर्जी यांच्या मते, हे इन्सुलिन आपण कितीही वेळ बाहेर ठेऊ शकतो. मधुमेही रुग्ण हे इन्सुलिन सोबत घेऊन कितीही लांबचा प्रवास करू शकणार आहेत. या महत्त्वाच्या इन्सुलिनला ‘इन्सुलॉक’ असे नाव देण्यात आले आहे.

Back to top button