पृथ्वीच्या अंतर्गत भागात वाढल्या हालचाली - पुढारी

पृथ्वीच्या अंतर्गत भागात वाढल्या हालचाली

वॉशिंग्टन : जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाची चादर वेगाने वितळू लागली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बिघडू लागते, याशिवाय यामुळे समुद्रांचे तापमानही वाढत आहे. याचा परिणाम सध्या हवा आणि पाण्याबरोबरच पृथ्वीच्या अंतर्गत भागावरही होताना दिसत आहे.

‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञ सोफी कोल्सन यांनी सांगितले की, ध्रुवीय भागातील बर्फ वितळू लागल्याचा परिणाम पृथ्वीच्या वरच्या थरावर (क्रस्ट) हजारो कि.मी. दूर अंतरापर्यंत दिसून येत आहे. कोल्सन यांनी पुढे सांगितले की, तसे पाहिल्यास ग्लेशियर्समुळे पाणी नेहमी खालच्या बाजूला दाबून राहते.

मात्र, ग्लेशियर्स वितळल्यानंतर हेच पाणी वर येते. यास ‘रिबाऊंडिंग इफेक्ट’ असे म्हटले जाते. याची झलक सध्या उत्तर ध्रुवापासून दूर स्कॉटलँड आणि कॅनडासारख्या परिसरात पाहता येऊ शकते. जेथे पाण्याची पातळी कमी असते. मात्र, सध्या हा परिणाम वैश्‍विक स्तरावर दिसून येत आहे.

कोल्सन यांनी सांगितले की, ग्लोबल वॉर्मिंगने ग्लेशियर्स वितळू लागल्याचा परिणाम पृथ्वीच्या वरच्या थरावर होत आहे. हा थर वरून खाली जाण्याऐवजी तो डाव्या अथवा उजव्या बाजूला सरकत आहे.

दरम्यान ‘डेली एक्स्प्रेस’च्या अहवालानुसार ज्यावेळी ‘लॉरेनटाईड आईस शिट’ वितळू लागली, तेव्हा कॅनडा व अलास्कामधील बर्फाचा दबाव कमी झाला. तसेच दक्षिण अमेरिकेतील सागरी पाण्याची पातळी वाढली नाही. मात्र, यामुळे कॅनडाच्या हडसन खाडीतील पाण्याची पातळी दरवर्षाला अर्ध्या इंचाने वाढत आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास 2200 पर्यंत वॉशिंग्टन डीसी पाण्यात बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button