तीन लाख वर्षांपूर्वी अस्वलांच्या फरने वाचवले माणसाला! | पुढारी

तीन लाख वर्षांपूर्वी अस्वलांच्या फरने वाचवले माणसाला!

बर्लिन : तीन लाख वर्षांपूर्वी कडाक्याच्या थंडीत माणसं कशी तग धरून राहिली याचे रहस्य आता उलगडले आहे. प्रागैतिहासिक काळातील प्राण्यांच्या कातडीने त्यांचा बचाव झाला होता. विशेषतः त्या काळी अस्तित्वात असणार्‍या गुहेतील अस्वलांची केसाळ कातडी माणसाला उपयोगी पडली. या कातडीपासून ते पोशाख आणि अंथरुण-पांघरुण बनवत होते.

जर्मनीच्या पुरातत्त्व संशोधकांनी सुरुवातीच्या काळातील पोशाखांबाबत हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. गुहेत राहणार्‍या अस्वलांच्या पंज्यावर एक विशिष्ट कट शोधण्यात आला आहे. त्यावरून असे दिसून येते की सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी अस्वलांसारख्या काही प्राण्यांची कातडी त्यांच्या फरसाठी उतरवण्यात आली होती. उत्तर जर्मनीतील शॉनिंगनमध्ये याबाबतचा शोध घेण्यात आला. कठोर हिवाळ्यात या फरच्या सहाय्याने माणूस जिंवत राहू शकला होता. फर, कातडी किंवा अन्य कार्बनिक पदार्थ सर्वसाधारणपणे एक लाखापेक्षा अधिक वर्षे सुरक्षित राहू शकत नाहीत.

त्याचा अर्थ प्रागैतिहासिक काळातील पोशाखांचा थेट पुरावा अतिशय कमी मिळू शकतो. मात्र, गुहांमधील भित्तीचित्रांमध्ये अनेक वेळा माणूस प्राण्यांची कातडी किंवा फरपासून बनवलेला पोशाख परिधान केलेला दिसून येतो. प्रागैतिहासिक काळात माणूस काय परिधान करीत होता, हे जाणून घेण्यासाठी आता हे नवे संशोधन महत्त्वाचे आहे. जर्मनीच्या तुबिंगेन युनिव्हर्सिटीतील इवो वेरहेजेन यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळातील काही मोजक्या ठिकाणीच अस्वलाची कातडी उतरवल्याचे पुरावे दिसून येतात. त्यामध्ये शॉनिंगेन हे महत्त्वाचे ठिकाण आहे. गुहेत राहणारे तत्कालीन अस्वले ही आकाराने मोठी होती.

सध्याच्या ध्रुवीय अस्वलांइतका त्यांचा मोठा आकार होता. ते सुमारे 25 हजार वर्षांपूर्वी लुप्त झाले. त्यांची केसाळ कातडी थंडीपासून बचाव करण्यासाठीचे एक उत्तम साधन होते. या कातडीचा कोट एक चांगले ‘इन्सुलेशन’निर्माण करीत होते आणि अंथरुणासाठीही तो उपयुक्त ठरत असे. त्याची कातडी शिवणकाम न करताच अंगाभोवती लपेटून घेतली जात असे. कपडे शिवण्याची सुई सुमारे 45 हजार वर्षांपूर्वीपासून वापरली जाऊ लागली असे पुरातत्त्वीय रेकॉर्डमध्ये आहे.

Back to top button