Seismic resistance test : इमारतींची भूकंपरोधक क्षमता तपासण्याची नवी पद्धत विकसित | पुढारी

Seismic resistance test : इमारतींची भूकंपरोधक क्षमता तपासण्याची नवी पद्धत विकसित

नवी दिल्ली : इमारती किंवा अन्य संरचनांच्या मजबुतीची तसेच त्यांच्या भूकंपरोधक क्षमतेची चाचणी करण्यासाठी सर्वसाधारणपणे रॅपिड व्हिज्युअल स्क्रीनिंग (आरव्हीएस) चा वापर केला जातो. ‘आरव्हीएस’ द़ृश्य सूचनांचा उपयोग हे निश्चित करण्यासाठी करते की एखादी इमारत किती सुरक्षित आहे आणि भूकंपापासून बचाव करण्यासाठी तिच्यामध्ये तत्काळ इंजिनिअरिंग सुधारणा किंवा दुरुस्तीची किती आवश्यकता आहे. आयआयटी मंडीतील संशोधकांनी आता हिमालयन क्षेत्रात इमारतींची भूकंप सहन करण्याच्या क्षमतेचे आकलन करण्यासाठी आता एक नवी पद्धत विकसित केली आहे.

भूकंपांबाबत इमारतींची संवेदनशीलता तपासण्याची ही पद्धत तुलनेने सरळ व सोपी आहे. त्यामुळे भूकंपाच्या काळात इमारती मजबूत राहतील याद़ृष्टीने त्यांच्यामध्ये ज्या दुरुस्ती किंवा डागडुजी करणे गरजेचे आहे ते करता येऊ शकते. व्यापक क्षेत्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून संशोधकांनी मंडीच्या हिमालय क्षेत्रात इमारतींचे प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर आधारित डेटा एकत्र केला आहे. हा डेटा भूकंपाबाबत इमारतींच्या संवेदनशीलतेशी संबंधित आहे.

डोंगराळ भागात इमारतींच्या पायाच्या गणनेसाठी दिशानिर्देश स्थापन करण्यास व अशा इमारतींची रॅपिड व्हिज्युअल स्क्रीनिंग (आरव्हीएस) करण्यासाठी संशोधकांनी एक संख्यात्मक अध्ययन केले आहे. इमारतींची स्क्रीनिंग पद्धत एका पानाच्या ‘आरव्हीएस’ माहितीपत्रावर आधारित आहे ज्यामधील माहिती भरण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची आवश्यकता नसते. विभिन्न संवेदनशील वैशिष्ट्यांना लक्षात ठेवून हे माहितीपत्र तयार करण्यात आले आहे. त्यामधून मिळालेल्या माहितीचा उपयोग इमारतींचा एक भूकंपीय भेद्यता स्कोर तयार करते.

या गुणांच्या आधारे मजबूत इमारती व कमजोर इमारतींना वेगवेगळे करता येते. त्यामधून कोणत्या इमारतींना योग्य दुरुस्तीची आवश्यकता आहे हे समजू शकते. आयआयटी मंडीतील स्कूल ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंगच्या डॉ. संदीप कुमार साहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पीएच.डी. विद्यार्थिनी यती अग्रवाल यांनी याबाबतचे संशोधन केले असून त्याची माहिती ‘बुलेटिन ऑफ अर्थक्वेक इंजिनिअरिंग’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button