घरात सापडला चिमुकला, दुर्मीळ साप | पुढारी

घरात सापडला चिमुकला, दुर्मीळ साप

रायपूर : सापांच्या सर्वच प्रजाती विषारी नसतात. साप दिसला की तो विषारी असावा म्हणून एक तर घाबरून जाणारे किंवा सापाला मारण्यासाठी धावणारे अनेक लोक असत. आता मात्र याबाबत चांगली जनजागृती झाल्याने लोक साप दिसला की जाणकार सर्पमित्रांना बोलावतात व ते अशा सापांना पकडून सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात. त्यामुळे अनेक सापांचे जीव वाचत आहेत. तसेच काही दुर्लभ प्रकारचे सापही लोकांना माहिती होत आहेत. आताही छत्तीसगढमध्ये असाच दुर्मीळ साप एका घरात आढळला. हा साप इतका चिमुकला आहे की तो तळहातावर सहज सामावू शकतो. अर्थातच हा एक बिनविषारी साप आहे.

छत्तीसगढच्या कवर्धा जिल्ह्यातील जंगलात अनेक दुर्मीळ जीव आढळतात. आता जोरातालमधील एका घरात हा दुर्मीळ साप आढळून आला. त्याचे नाव आहे ‘डूमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक’. तेथील नोवा नेचर वेलफेयर सोसायटीचे सदस्य अविनाश ठाकूर यांना एका घरात नेहमीच्या सापांपेक्षा वेगळा साप आल्याचा फोन आला. सर्पमित्र अविनाश यांनी तिथे जाऊन पाहिले तर हा दुर्मीळ साप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी या चिमुकल्या आणि बिनविषारी सापाची माहिती लोकांना दिली. या बिनविषारी सापाचा आहार छोटे किडे, पतंग हे असतात. हे साप इतके लहान असतात की एखाद्या माणसाच्या तळहातावरही ते सहज सामावू शकतात.

Back to top button