आठ कोटी वर्षांपूर्वी होते तब्बल बारा फुटी कासव! | पुढारी

आठ कोटी वर्षांपूर्वी होते तब्बल बारा फुटी कासव!

माद्रिद : प्रागैतिहासिक काळातील डायनासोरच नव्हे तर अन्यही जीवांबाबत मोठेच कुतूहल असते. आता स्पेनमधील संशोधकांनी प्रागैतिहासिक काळातील सागरी कासवांची एक अनोखी प्रजाती शोधून काढली आहे. युरोपियन भूमीवर वावरलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठ्या आकाराची कासवं ठरली आहेत. 8 कोटी वर्षांपूर्वीच्या या कालौघात लुप्त झालेल्या कासवांची लांबी तब्बल 12 फूट होती!

सध्याच्या सागरी कासवांच्या तुलनेत दुपटीपेक्षाही मोठ्या आकाराची ही कासवं होती. त्यांची लांबी सुमारे 12.3 फूट म्हणजेच 3.7 मीटर होती. या नव्या प्रजातीला संशोधकांनी ‘लेवियाथॅनोचेलिस एनिग्मॅटिका’ असे नाव दिले आहे. स्पेनच्या ईशान्य भागातील कॅल टोरॅडिस येथे या कासवांचे 2016 ते 2021 या काळात जीवाश्म सापडले होते. युरोपियन भूमीवर असलेल्या प्राचीन समुद्रात हे कासव 83.6 ते 72.1 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळात म्हणजेच क्रेटाशियस युगात वावरत होते.

ती युरोपातील सर्वात मोठी कासव प्रजाती ठरली आहे. सध्या लेदरबॅक टर्टल म्हणजेच ‘डर्मोचेलिस कोरियासिया’ प्रजातीच्या कासवांना सर्वात मोठी सागरी कासवांची प्रजाती मानले जाते. त्यांची लांबी 5.9 फूट असते. त्याच्या तुलनेत दुपटीपेक्षाही अधिक अशी ही प्रागैतिहासिक काळातील सागरी कासवं होती. मात्र ती जगातील सर्वात मोठी कासवं ठरत नाहीत. ‘आर्चेलॉन इसचिरोस’ प्रजातीची कासवं तब्बल 15 फूट लांबीची होती. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात त्यांचे जीवाश्म सापडले होते.

Back to top button